बसच्या धडकेत सुळेभावीचा तरुण ठार

बसच्या धडकेत सुळेभावीचा तरुण ठार

बेळगाव-गोकाक बसला खनगावनजीक अपघात : भरधाव बस शेतवडीत कलंडली
बेळगाव : भरधाव बसची दुचाकीला धडक बसून बेळगाव-गोकाक रोडवरील खनगाव खुर्दजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात सुळेभावीच्या विणकर तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर शेतवडीत बस कलंडली असून बसमधील काही प्रवाशांना किरकोळ इजा पोहोचली आहे. विठ्ठल दत्ता लोकरे (वय 30) रा. कलमेश्वरनगर, सुळेभावी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो आपल्या होंडा अॅक्टिव्हावरून बेळगावकडे येत होता. त्यावेळी बेळगाव-गोकाक बसची दुचाकीला धडक बसली. गंभीर जखमी अवस्थेतील विठ्ठलला सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
विठ्ठलच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. दुचाकीला ठोकरल्यानंतर बस रस्त्याशेजारील शेतवडीत कलंडली आहे. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मारिहाळ पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी पुढील तपास करीत आहेत. अपघातात विणकर कामगाराचा मृत्यू झाल्यामुळे सुळेभावी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.