काकती हाणामारी प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी निदर्शने

काकती हाणामारी प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी निदर्शने

काकती पोलीस स्थानकासमोर ठिय्या : पोलीस स्थानकाला घेराव घालण्याचाही प्रयत्न
बेळगाव : शेतजमिनीच्या वादातून काकती, ता. बेळगाव येथे गेल्या आठवड्यात झालेल्या हाणामारीनंतर परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती. मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी शुक्रवारी काकती पोलिसांसमोर निदर्शने करण्यात आली. गेल्या शुक्रवार दि. 31 मे रोजी सायंकाळी हाणामारीची ही घटना घडली होती. मुंगारी व टुमरी कुटुंबीयांत झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले होते. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात परस्परांविरुद्ध एफआयआर दाखल केले होते. शुक्रवारी मुंगारी कुटुंबीय व काही शेतकरी नेत्यांसह शंभरहून अधिक जणांनी काकती पोलीस स्थानकासमोर ठाण मांडले. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी काकती पोलीस स्थानकाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. हाणामारीसाठी बाहेरून गुंड आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस स्थानकाला घेराव घालण्याचाही प्रयत्न झाला.