ऋणानुबंधाचा धागा…सलोख्याने वागा!

ऋणानुबंधाचा धागा…सलोख्याने वागा!

हिंदू बाळंतिणीचा मुस्लीम कुटुंबीयांकडून दीड महिना सांभाळ : मार्केट पोलिसांनी केला सत्कार
बेळगाव : प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या, परिस्थितीने गांजलेल्या एका हिंदू महिलेला मुस्लीम कुटुंबीयांनी आपल्या घरी आश्रय दिला आहे. त्या महिलेची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन मुस्लीम कुटुंबीयांनी तब्बल दीड महिना बाळ-बाळंतिणीचा सांभाळ केला आहे. हिंदू-मुस्लीम सलोख्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. हिंदू महिलेला आपल्या घरी आश्रय देऊन तिचा व तिच्या नवजात शिशूचा सख्ख्या बहिणीप्रमाणे सांभाळ करणाऱ्या गोकाक तालुक्यातील मुस्लीम कुटुंबीयांचा मार्केट पोलिसांनी रविवारी गौरवही केला. पोलीस स्थानकात बोलावून या कुटुंबीयांचा यथोचित आदर-सत्कार करण्यात आला आहे. दि. 20 एप्रिल रोजी दंडापूर, ता. गोकाक येथील शांतव्वा कुमार निडसोशी ही महिला प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. मोठ्या मुलीला घरीच सोडून लहान मुलीला सोबत घेऊन प्रसूतीसाठी ती एकटी आली होती. नॉर्मल डिलिव्हरी होईल, अशी तिची अपेक्षा होती. मात्र, तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. प्रसूतीनंतर तब्बल तीन दिवस शांतव्वा बेशुद्धच होती.
शांतव्वाची काळजी घेण्यासाठी तर कोणी नव्हते. तिच्या लहान मुलीचा सांभाळ करणेही अवघड होते. शांतव्वाच्या शेजारील कॉटवर उपचारासाठी दाखल झालेल्या नवी गल्ली, कोण्णूर, ता. गोकाक येथील शमा रिजवान देसाई या महिलेला शांतव्वाची परिस्थिती समजली. ती शुद्धीवर येईपर्यंत शांतव्वाने सोबत आणलेल्या मुलीबरोबरच नुकत्याच जन्मलेल्या मुलीचाही सांभाळ केलाच शिवाय शांतव्वाचीही शमा व तिच्या कुटुंबीयांनी काळजी घेतली. शुद्धीवर आल्यानंतर शांतव्वाने आपल्यामागे कोणीच नाही. पतीही व्यवस्थित बघत नाही. आता कोठे जायचे? हा आपल्या समोरील मोठा प्रश्न आहे, असे सांगितले. शांतव्वाची दया येऊन शमा देसाईने तिला तिच्या मुलांसमवेत कोण्णूर येथील आपल्या घरी नेले. तब्बल एक-दीड महिना बाळ-बाळंतिणीचा सांभाळ केला. तिच्यासाठी आलेल्या खर्चाचाही भार समर्थपणे उचलला. रविवार दि. 2 जून रोजी शांतव्वा व तिच्या नवजात शिशूला वैद्यकीय तपासणीसाठी शमा व तिच्या कुटुंबीयांनी बेळगावला आणले. बाळ-बाळंतिण सुखरुप आहेत, हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या कुटुंबीयांनी शांतव्वाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना बेळगावला बोलावून घेतले. मार्केट पोलीस स्थानकात जाऊन ‘दीड महिना शांतव्वा आपल्या घरी होती. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. तिला तुमच्याकडे सोपवत आहोत’, असे सांगत कुटुंबीयांकडे सोपविले. या मानवी भावभावनांच्या प्रसंगाचे रविवारी मार्केट पोलीसही साक्षी ठरले. पोलीस निरीक्षक प्रदीप तळकेरी, उपनिरीक्षक हुसेन करुर, उपनिरीक्षक महांतेश मठपती, हवालदार नवीनकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शमा व शांतव्वा यांचा पोलीस स्थानकात सत्कार केला. चहापानाचा कार्यक्रम करून पोलिसांनी आनंदाने या दोन्ही कुटुंबीयांना त्यांच्या गावी पाठवले.
पोलीस स्थानकही गहिवरले
पोलीस स्थानक म्हटले, की मारबडव, आरडाओरड, शिवीगाळ हे असतेच. रविवारी मार्केट पोलीस स्थानकात मानवी भावबंध जपणाऱ्या कुटुंबीयांचा हृद्य सत्कार झाला. यावेळी काही काळापुरते पोलीस स्थानकातील वातावरणही गहिवरले होते. केवळ जाहीर कार्यक्रमात किंवा राजकीय व्यासपीठावर हिंदू-मुस्लीम सलोख्याच्या बाता करणाऱ्यांना रविवारची ही घटना एक आदर्श घालून देणारी ठरली.