परिवहनच्या ताफ्यात नवीन 55 बसेस

परिवहनच्या ताफ्यात नवीन 55 बसेस

दोन पालखी बसेसचा समावेश : ताण काही अंशी कमी, अद्यापही 100 बसेसची कमतरता जाणवणार
बेळगाव : बेळगाव परिवहनच्या ताफ्यात नवीन 55 बसेस नुकत्याच दाखल झाल्या आहेत. यामध्ये दोन पालखी बसचा समावेश आहे. सार्वजनिक बससेवेवरील  प्रवाशांचा ताण काहीअंशी कमी झाला आहे. दाखल झालेल्या बसेस लांब आणि स्थानिक मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. परिवहनला नवीन 150 बसेसची गरज असताना केवळ 55 बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अद्यापही 100 बसेसची कमतरता जाणवणार आहे. बेळगाव परिवहन विभागाला महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द लागून असल्याने आंतरराज्य प्रवासी संख्या अधिक आहे. शिवाय शक्ती योजनेमुळे प्रवासी संख्येत मोठी भर पडली आहे. त्या तुलनेत केवळ 634 बसेस सेवा देत आहेत. त्यामुळे परिवहनला सातत्याने बसची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत बसचे नियोजन करताना डोकेदुखी वाढू लागली आहे. राज्य सरकारकडून नवीन बस खरेदीसाठी अनुदान मंजूर झाले होते. त्यानुसार 55 बसेस दाखल झाल्या आहेत. मात्र अद्यापही 100 बसेसची गरज आहे. मात्र बसच्या कमतरतेमुळे सद्यपरिस्थितीत असलेल्या बसवरच डोलारा सुरू आहे. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे.
त्यामुळे विविध मार्गांवरील बससेवा अनियमित होऊ लागली आहे. दोन वर्षांपूर्वी परिवहनने बीएमटीसीकडून आयुर्मान संपलेल्या जुन्या बस खरेदी केल्या होत्या. मात्र त्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाकाळात परिवहनला मोठा फटका बसला होता. परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन 55 बसेस कमतरता असलेल्या ठिकाणी सोडल्या जात आहेत. काही बसेस लांबपल्ल्यासाठी मुंबई, बेंगळूर, म्हैसूर आदी ठिकाणी पाठविल्या जात आहेत. तर काही बसेस स्थानिक रस्त्यावर धावत आहेत. परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या अधिक असल्याने सार्वजनिक बससेवेवर परिणाम होत आहे. यासाठी नवीन बसेसची गरज भासणार आहे. राज्य सरकार याकडे कधी लक्ष देणार? हेच पहावे लागणार आहे. बेळगाव विभागातून सर्वाधिक महसूल प्राप्त होतो. मात्र याच बेळगाव विभागात बसेसची कमतरता असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात धावणाऱ्या बसमधून 40 टक्के उत्पन्न मिळते. त्यामुळे आंतरराज्य सेवेसाठी धावणाऱ्या बसेसही सुसज्ज असणेही आवश्यक आहे.
दोन पालखी बस सेवेत
प्रवाशांना आरामदायी बससेवा देण्यासाठी पालखी बस सुरू केली आहे. राज्य सरकारने बेळगाव परिवहन विभागाला दोन पालखी बस दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
पुन्हा नवीन बसेससाठी पाठपुरावा…
एप्रिल अखेरीस बेळगाव परिवहनला नवीन 55 बसेस मिळाल्या आहेत. त्यामध्ये दोन पालखी बसचा समावेश आहे. त्यामुळे बसवरील ताण काहीअंशी कमी होणार आहे. मात्र अद्यापही 100 बसेसचा तुटवडा आहे. सरकारकडे पुन्हा नवीन बसेससाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.
– अनंत शिरगुप्पीकर-डेपो मॅनेजर