बांगलादेशचा सलग चौथा विजय

बांगलादेशचा सलग चौथा विजय

वृत्तसंस्था/ मिरपूर
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या चौथ्या सामन्यात यजमान बांगलादेशने झिंबाब्वेचा 5 धावांनी पराभव करत 4-0 अशी एकतर्फी विजयी आघाडी मिळविली आहे. या सामन्यात बांगलादेशच्या मुस्ताफिजुर रेहमानला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशचा डाव 19.5 षटकात 143 धावात आटोपला. त्यानंतर झिंबाब्वेचा डाव 19.4 षटकात 138 धावात संपुष्टात आल्याने त्यांना हा सामना 5 धावांनी गमवावा लागला.
बांगलादेशच्या डावामध्ये तानझिद हसनने 37 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 52, तर सौम्या सरकारने 34 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 41 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 11.2 षटकात 101 धावांची भागिदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर बांगलादेशचे उर्वरीत 9 फलंदाज 42 धावात तंबूत परतले. यापैकी एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशला 15 अवांतर धावा मिळाल्या. झिंबाब्वेतर्फे जाँग्वेने 3, निगरेवा, बेनेट यांनी प्रत्येकी 2, सिकंदर रजा व मुझारबन्नी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यानंतर झिंबाब्वेच्या डावात कॅम्पबेलने 27 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 31, मेरूमनीने 13 चेंडूत 3 चौकारांसह 14, कर्णधार सिकंदर रजाने 10 चेंडूत 4 चौकारांसह 17, मंदाडेने 1 चौकारासह 12, ब्युरेलने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 19, अक्रमने 1 षटकारांसह 11, मासाकेझाने 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 19 तर मुझारबन्नीने 1 षटकारासह 8 धावा केल्या. झिंबाब्वेच्या डावात 6 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने 35 धावात 4, मुस्ताफिजुर रेहमानने 19 धावांत 3, टी. अहमदने 20 धावात 2 तसेच आर. हुसेनने 6 धावात एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 19.5 षटकात सर्वबाद 143 (टी. हसन 52, सरकार 41, रिदॉय 12, जाँग्वे 3-20, निगरेवा, बेनेट प्रत्येकी 2 बळी, रजा, मुझारबन्नी प्रत्येकी एक बळी), झिंबाब्वे 19.4 षटकात सर्वबाद 138 (कॅम्पबेल 31, मेरूमनी 14, सिकंदर रजा 17, मंदाडे 12, ब्युरेल 19, अक्रम 11, मासाकेझा नाबाद 19, शकीब अल हसन 4-35, मुस्ताफिजुर रेहमान 3-19, टी अहमद 2-20, आर. हुसेन 1-6).