देवमाशाचं मरण स्वस्त होतंय…

देवमाशाचं मरण स्वस्त होतंय…

गेल्या वर्षभरात कोकण किनारपट्टीवर मृत व्हेल मासे सापडण्याचे प्रमाण अलिकडे वाढल्याचे नजरेस येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या किनारी भागात वर्षभरात साधारण दहा ते पंधरा व्हेल मृतावस्थेत आढळतात. व्हेलला ‘देवमासा’ असेही म्हटले जाते. त्याच्या मृत्यूची बरीच कारणे आहेत. मोठ्या यांत्रिक नौकांना धडकल्याने, जाळ्यात अडकल्याने जखमी होऊन तो कळपापासून दूर होतो. आणि मग किनारपट्टीला लागतो. प्रचंड वजनाच्या या माशाला पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न करूनही त्याची जगण्याची शक्यता फारशी नसते. व्हेलचे वाढते मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे.
 
टुथ व्हेल हा किलर व्हेल म्हणून ओळखला जातो. तो धोकादायक असून अटलांटिक, अंटार्टिका या ठिकाणी त्याचा आढळ असतो. तर बलिन व्हेल भारतात आढळतात. व्हेल समुद्रातील पाणी मोठ्या प्रमाणात पोटात घेतात. त्यातील प्लवंग, मासे गाळून उर्वरित पाणी बाहेर सोडून देतात. व्हेल थंड पाण्यात खोलवर ठिकाणी असतात. मात्र, तेथे खाद्य कमी पडले की ते वरच्या भागात स्थलांतरित होतात.
व्हेल हा सस्तन प्राणी असून त्याची कातडी खूप जाड असते. लांबी 50 ते 70 मीटर तर वजन 50 टन असते. 12 ते 14 महिन्यांचा त्यांचा गर्भार काळ असतो. व्हेल हा कळपाने राहणारा प्राणी आहे. त्याचे आयुष्य 100 ते दीडशे वर्षे एवढे असते. 1972 च्या वाईल्ड लाईफ अॅक्टनुसार तो श्रेणी एकमध्ये येतो. त्यामुळे त्याच्या शिकारीवर बंदी आहे. तरीदेखील परदेशात व्हेलची शिकार केली जाते.
व्हेल माशाच्या मृत्यूची कारणे ही नैसर्गिक आणि मानवनिर्मितही आहेत. जखमी झाल्याने त्याची हालचाल मंदावते आणि तो कळपापासून दूर जातो. कमी खोलीच्या पाण्यात आल्यावर तो किनारी भागात फेकला जातो. त्यामुळेही त्याचा मृत्यू ओढवतो. डिहायड्रेशन हेदेखील त्याच्या मृत्यूचे कारण बनते. काहीवेळा व्हेल्स आजारी असतील अथवा त्यांना संसर्ग झाला असेल किंवा म्हातारपणामुळे त्यांना मृत्यूची जाणीव झाली असेल तरी ते आपल्या कळपापासून वेगळे होतात. असे मरणासन्न व्हेल्स किनाऱ्यावर येऊ शकतात. याशिवाय प्लास्टिक प्रदूषण, ऑईल गळती यामुळेही व्हेलचा मृत्यू होतो. व्हेल माशांना लंग्ज असतात. ते ऑक्सिजनचा साठा करून ठेवतात. ऑक्सिजन कमी झाला तर ते वर येतात. कधी कधी पाण्याबाहेर उसळी घेताना दिसतात. मग त्यांच्या मागावर असलेले हंटर्स त्यांची शिकार करतात.
जगात व्हेलची शिकार मोठ्या प्रमाणात होते. स्पर्म व्हेल माशाच्या डोक्याच्या पोकळीत असलेल्या स्पर्मासेटी तेलामुळे 18 व्या शतकात त्याची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात असे. थंड प्रदेशात स्पर्म तेलाचे दिवे व मेणबत्ती तयार करण्यासाठी वंगण म्हणून हे तेल वापरले जात असे. स्पर्म व्हेलच्या अन्ननलिकेत असलेला उदी अंबर (अंबरग्रीस) हा मेणसारखा पदार्थ सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी वापरला जातो. व्हेल मासा मोठ्या प्रमाणात म्हाकूल खातो. मात्र अजीर्ण झाल्यावर तो उलटी करतो. ही उलटी पाण्यात राहिल्यामुळे घट्ट होते. बऱ्याचदा ती किनारी भागात वाहून येते. मच्छीमारांना सापडते. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये या उलटीला कोट्यावधी रुपये मिळत असल्याने व्हेलच्या उलटीच्या तस्करीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अलिकडच्या काही महिन्यात कोकण किनारपट्टी भागात अशी उलटी सापडली होती. तसेच तस्करीचे गुन्हेही उघडकीस आले होते.
 
व्हेलचे अवयव पाण्यात राहण्यासाठी अनुकूल असतात. त्यामुळे ते जमिनीवर जगू शकत नाहीत. शरीरात हवा घेण्यासाठी त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. मात्र, ते पाण्याखाली बराच काळ राहू शकतात. त्यावेळी ऑक्सिजन बराचवेळ साठवून ठेवण्यासाठी ते हृदयाचे ठोके कमी करतात. तसेच समुद्रात खोल जाण्याआधी ते पाण्याच्या पृष्ठभावर येतात. शरीरात पुरेशी हवा घेऊन ते पाण्याखाली जातात. व्हेलच्या डोक्यांवर नाकपुड्यांसारखी रचना म्हणजे वातछिद्रे असतात. त्याद्वारे ते हवा शरीरात घेतात आणि बाहेर टाकतात. श्वसनप्रक्रियेत जेव्हा हवा बाहेर टाकली जाते, तेव्हा वरच्या दिशेने कारंज्यासारखा पाण्याचा फवारा बाहेर फेकला जातो आणि ताजी हवा आत घेतली जाते. हम्पॅक व्हेल एकावेळी सुमारे पाच हजार लिटर हवा शरीरात साठवू शकतात.
 
सोनार तरंग लहरींचा परिणाम
मोठमोठ्या बोटींची धडक बसल्यानेही व्हेल भरकटतो. त्याचबरोबर समुद्राखालील शोधासाठी सोनार (साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग) यंत्रणा वापरली जाते. सोनार म्हणजे अत्यंत कमी तरंगलांबी असलेला आवाज. समुद्रातील वाहनांचा शोध घेण्यासाठी किंवा तेल संशोधनासाठी ‘सोनार’चा वापर केला जातो. देवमासे आणि डॉल्फिन्स अत्यंत संवेदनशील असतात. ‘सोनार’च्या तरंगलहरी कानात शिरून डोक्यातून रक्तस्राव होण्याचीही शक्यता असतो. दुसऱ्यांच्या अॅकोस्टिकचाही व्हेलला त्रास होतो. काहीवेळा हे आवाज म्हणजे त्यांना अधिक मोठा देवमासा येत असल्याचा संदेश वाटतो आणि भरधाव वेगात ते दिशाहीन भरकटतात. 1973 मध्ये तामिळनाडूच्या थुथुकोडी किनाऱ्यावर देवमासे लागले होते. त्याआधी दोन वर्षे 1971 मध्ये युद्ध झाले होते, त्यावेळी संरक्षण दलाकडून सोनारचा वापर केला गेला होता.
 
घोस्ट फिशिंग
अलिकडच्या काळात अनिर्बंध मासेमारी वाढली आहे. त्यासाठी आधुनिक बोटी वापरल्या जातात. तसेच जाळीही मांजाटाईप कातर तसेच टिकावू वापरली जातात. ही मोठ्या आसाची जाळी मोठ्या नौका तोडून नेतात. तसेच वादळीवाऱ्यात वाहून जाता. फिशिंग करताना जाळी तुटतात. अशी जाळी समुद्रात दीर्घकाळ राहतात. त्यात अडकून माशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. समुद्रात तरंगणारे प्लास्टिक अथवा इतर कचरा खाद्य समजून व्हेल्स खातात. त्यामुळे श्वसनाला अडथळा येऊन गुदमरून ते मरतात. समुद्रातील तेलाचा तवंग त्यांच्या त्वचेवर आणि नाकपुड्यांवर साचून श्वास न घेता आल्यानेही त्यांचा मृत्यू ओढवतो.
 
ब्रायडिज व्हेलचे दर्शन
अलिकडेच सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर मच्छीमारांना ब्रायडिज व्हेलचे दर्शन झाले होते. वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक परिसरातही मच्छीमारांना अधुनमधून समुद्राच्या पृष्ठभागावर येणाऱ्या नर आणि मादी व्हेलचे दर्शन होते. त्यामुळे त्या भागात त्यांचे वसतिस्थान असल्याचा स्थानिक मच्छीमारांचा कयास आहे.
 
रत्नागिरीच्या मत्स्यालयात सांगाडा
रत्नागिरीच्या मत्स्यालयात व्हेल माशाचा सांगाडा संशोधनासाठी ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत किनारपट्टीवर मृतावस्थेत आढळलेला व्हेलही किनारी भागात पुरला जातो. मात्र, बऱ्याचदा काही भाग वर राहिल्याने आणि प्राण्यांनी लचके तोडल्याने दुर्गंधीही पसरते. अलिकडे रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी असा व्हेल मासा मृतावस्थेत सापडला होता. तोदेखील पुरण्यात आला.
 
स्थानिक भाषेत संबोधतात ‘टिव’
व्हेल माशाला देवमासा संबोधले जाते. स्थानिक मच्छीमार याला ‘टिव’ असेही म्हणतात. बोटीनजीक त्याचे दर्शन झाले तर नारळ फोडून अर्पण करण्याची प्रथाही आहे. देवमाशाला बोटीची धडक बसली तर तो पाठलाग करतो, असेही सांगितले जाते.
 
व्हेलचे आगमन मच्छीमारांसाठी लाभदायी
व्हेल माशाचा वावर शक्यतो खोल भागातच असतो. मात्र, काहीवेळा तो खाद्याच्या शोधात उथळ भागात येतो. त्याच्या चाहुलीने मासे किनारपट्टीच्या दिशेने पळतात. त्यामुळे मच्छीमारांना चांगला कॅच मिळतो. म्हणूनच व्हेलचे आगमन मच्छीमारांच्या दृष्टीने सुखावह मानले जाते.
 
व्हेल फॉल
व्हेलचे मरण जवळ येते तेव्हा तो हवेत फवारा सोडून जलसमाधी घेतो, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. तो ज्या भागात जलसमाधी घेतो, त्या भागात त्याचे मांस कुजून परिसंस्था तयार होते. याला ‘व्हेल फॉल’ असेही म्हटले जाते. पर्यावरणाच्या दृष्टीने हा व्हेल फॉल महत्वाचा मानला जातो.
 
 
—————————-,!0
(फोटो : डॉ. संतोष मेतर)
व्हेल माशाच्या मृत्यूची कारणे ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित आहेत. जाळ्यात अडकून वा नौकांच्या धडकेने जखमी झाल्याने तो किनारी भागात फेकला जातो. ‘घोस्ट फिशिंग’ वाढत आहे. व्हेल माशांची अॅकोस्टिक सिस्टिम असते. तसे अन्य अॅकोस्टिक सिस्टिमचाही त्यांना त्रास होत असतो. त्याबाबत तसेच घोस्ट फिशिंगबाबातही जनजागृतीची गरज आहे. घोस्ट फिशिंगबाबत अन्य देशांमध्ये संशोधन आणि कृती मोठ्या प्रमाणात होते. मात्र, आपल्याकडे त्याचा अभाव दिसून येतो.
-प्रा. डॉ. संतोष मेतर, फिशरीज कॉलेज, शिरगाव-रत्नागिरी