‘इंडिया’ची उद्या दिल्लीत महारॅली

‘इंडिया’ची उद्या दिल्लीत महारॅली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात रविवार, 31 मार्च रोजी ‘इंडिया’ आघाडीची महारॅली होणार आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्ली पोलिसांकडून मंजुरी घेतली आहे. पोलिसांनी मान्यता देताना एक अटही घातली असून रॅलीत 20 हजारांहून अधिक लोकांना सहभागी करण्यास मनाई आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या बॅनरखाली निघणाऱ्या या रॅलीचे घोषवाक्य ‘हुकूमशाही हटाओ, लोकशाही बचाओ’ असे असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून त्यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात ‘इंडिया’ आघाडी मोठी रॅली काढण्याच्या तयारीत आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फाऊख अब्दुल्ला, कल्पना सोरेन, चंपाई सोरेन, सीताराम येचुरी, भगवंत मान, डी राजा, दीपंकर भट्टाचार्य, जी. देवराजन आदी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.