सोलापूर : आलेगाव येथे वीज पडून दोन गाई ठार
सांगोला :Bharat Live News Media वृत्तसेवा : विजेच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह शहर व तालुक्यात शनिवारी रंगपंचमीच्या मुहूर्तावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये वीज पडून आलेगाव येथील सयाजी बाबर यांच्या दोन गाई मरण पावल्याची माहिती रात्री उशिरा समजली आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल होऊन शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंड हवेचा दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शनिवारी सांगोला शहर व तालुक्यात रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त मेघराजाने हजेरी लावल्याने रंगपंचमी साजरी करणाऱ्या चिमुकल्या बालकांसह तरुणांचा आणि नागरिकांचा आनंद द्विगुणात झाला. पावसानेही रंगपंचमी साजरी केली अशीच चर्चा रंगली होती. तर सांगोला शहर व तालुक्यात शनिवार ३० रोजी सायं. ७ नंतर झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यात आंब्यांच्या बागांना मोठा फटका बसला असून फळे गळून पडल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मागील दोन – तीन दिवसापासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तीव्र उन्ह, आणि सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरणात हलकासा पाऊस मार्च महिन्यात वादळी वारे अवकाळी पाऊस झाल्यास मान्सूनपुर्व पावसावर या पावसाचा परिणाम होईल असे जाणकार शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
Latest Marathi News सोलापूर : आलेगाव येथे वीज पडून दोन गाई ठार Brought to You By : Bharat Live News Media.