आज मतदान, जिल्हा प्रशासन सज्ज

आज मतदान, जिल्हा प्रशासन सज्ज

मतदानाचा हक्क बजावून उत्सव साजरा करा : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आवाहन
बेळगाव : बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. 24 हजार निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून तीन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रशिक्षण व माहिती देऊन निवडणूक कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पाठवून देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मतदारांनी उत्सव मानून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. बेळगाव, चिकोडीसह कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खानापूर व कित्तूर मतदारसंघामध्ये 4 हजार 524 मतदार केंद्रे आहेत. त्यानुसार मतदान यंत्रे पुरविण्यात आली आहेत. व्हीव्हीपॅट यंत्र अत्यंत सुक्ष्मपणे हाताळण्यासाठी
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. उन्हापासून त्याचे संरक्षण करण्याची सूचना करण्यात आली आहे. उन्हामुळे सेन्सर खराब होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अतिदक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. कोणत्याही मतदान केंद्रावर यंत्रामध्ये बिघाड झाल्यास तत्काळ यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी 30 टक्के मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. तर यंत्रे बनविलेल्या कंपनीकडून 36 अभियंते उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली. मतदान यंत्रे कोणत्या मतदान केंद्रांवर पाठविली जात आहेत, याबाबतची माहिती संबंधित पक्षाच्या लोकप्रतिनिधींना देण्यात आली आहे. एखाद्यावेळी यंत्रामध्ये बिघाड झाल्यास बदलण्यात येणाऱ्या यंत्राची माहिती निवडणूक आयोगाला कळवून याची ऑनलाईनवरही माहिती दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणूक कामासाठी कोणत्याच प्रकारची समस्या नसून सर्व तयारी करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ज्या मतदार केंद्रांवर सावली उपलब्ध नाही, अशा ठिकाणी मतदारांना उभारण्यासाठी मंडप घालण्यात आले आहेत. तसेच पाण्यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 लाख 23 हजार 788 मतदार
बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 लाख 23 हजार 788 मतदार आहेत. 9 लाख 57 हजार 559 पुऊष मतदार असून 9 लाख 66 हजार 134 महिला मतदार आहेत. तर 95 तृतीय पंथी मतदार आहेत. जिह्यामध्ये 1 लाख 24 हजार 419 युवा मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये चिकोडी लोकसभा मतदारसंघात 58,176 तर बेळगाव लोकसभा मतदारसंघात 53 हजार 922 युवा मतदारांची संख्या आहे. कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खानापूर व कित्तूर तालुक्यांमध्ये बारा हजार 321 युवा मतदारांची संख्या आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून 13 उमेदवार रिंगणात आहेत.
चिकोडी लोकसभा मतदारसंघात 17 लाख 61 हजार 694 मतदार
लोकसभा निवडणुकीसाठी चिकोडी लोकसभा मतदारसंघात सर्व मतदान केंद्रांसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. शनिवारी चिकोडी मतदारसंघातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघातून अधिकारी, कर्मचारी, पोलीस रवाना झाले. चिकोडी मतदारसंघातील 18 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद होणार आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात एकूण 1896 मतदान केंद्रे असून यासाठी 8792 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच 40 सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. याबरोबरच  चिकोडी-सदलगा मतदारसंघासाठी 984 कर्मचारी रवाना झाले. एकूण 17 लाख 61 हजार 694 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा. सुटीचा दिवस असून  मतदारांनी न चुकता मतदानाचा हक्क बजावावा. आपल्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांना प्रोत्साहित करून मतदान करण्यासाठी यावे. सध्या करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा आहे.
-नितेश पाटील, जिल्हा निवडणूक अधिकारी

बेळगाव लोकसभा मतदारसंघ-19,23,788
एकूण मतदार- 9,57,559
पुऊष मतदार -9,66,134
महिला मतदार -13 उमेदवार रिंगणात