मत किंवा जिहाद : एकाची निवड करा!

मत किंवा जिहाद : एकाची निवड करा!

या लोकसभा निवडणुकीत मतदारांसमोर विरोधकांनी मत किंवा जिहाद असा पर्याय ठेवला आहे. मतदारांना या पैकी एकाची निवड करावी लागणार आहे. मतदारांनी सूज्ञपणे मतदान करुन विकासाच्या पक्षाची निवड करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणातील भोंगीर येथे प्रचारसभेत केले आहे. विरोधकांना मत दिल्यास ते जिहादला दिल्याप्रमाणे होईल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला मत दिल्यास देश बलवान होईल. भारतातील अनेक पक्ष केवळ एका कुटुंबाच्या स्वार्थासाठी कार्य करीत आहेत. तथापि, भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशाचा विकास व्हावा यासाठी प्राणपणाने झटत आहे. या देशातील मतदार शहाणा आणि विचारी आहे. तो विकासासाठीच मतदान करेल, असा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादनही अमित शहा यांनी भाषणात केले.
ओबीसींचा वाटा मुस्लीमांना
तेलंगणात काँग्रेसने अन्य मागासवर्गीय आणि अनुसूचित जातींना मिळणाऱ्या आरक्षणातील साडेचार टक्के आरक्षण कमी करुन ते मुस्लीमांना दिले आहे. धर्माच्या नावावर आरक्षण देणे आपल्या राज्यघटनेशी विसंगत आहे. पण मुस्लीम अनुनयासाठी काँग्रेस घटनेची पायमल्ली करीत असून या पक्षाला रोखणे आवश्यक आहे. हे काम मतदार उत्तमरित्या करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.