मनपाचे व्हर्टिकल गार्डन लटकले!

मनपाचे व्हर्टिकल गार्डन लटकले!

पर्यावरणाचा नारा देऊनही मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : महानगरपालिकेने नूतन इमारतीच्या भिंतीवरच व्हर्टिकल गार्डन तयार केले होते. त्यामध्ये विविध प्रकारची रोपटी लावण्यात आली होती. मात्र आता ती पूर्णपणे वाळून गेली असून, केवळ व्हर्टिकल गार्डनच्या कुंड्या लटकत आहेत. त्यामुळे व्हर्टिकल गार्डनच लटकले असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. पर्यावरण जपण्यासाठी तसेच शहराच्या जनतेला याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महानगरपालिकेने भिंतीवरच व्हर्टिकल गार्डन तयार केले. त्या ठिकाणी कुंड्या लावल्या. त्या कुंड्यांमध्ये रोपटी लावली गेली. काही दिवस त्या रोपट्यांचे संगोपन करण्याचा आव आणण्यात आला. मात्र आता त्याकडे महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. व्हर्टिकल गार्डनच तेथून नाहीसे झाले असून केवळ लटकलेल्या कुंड्या आता दिसू लागल्या आहेत. याकडे मनपा आयुक्त लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.