विमान फेऱ्यांमध्ये नवीन भर नाहीच

विमान फेऱ्यांमध्ये नवीन भर नाहीच

उन्हाळी हंगामातील वेळापत्रक जाहीर, डीजीसीएकडून निराशा
बेळगाव : डीजीसीएकडून विमानांचे उन्हाळी हंगामातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये बेळगावमधून सुरू असलेल्या विमानफेऱ्यांमध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून नव्या वेळापत्रकानुसार विमानांचे उ•ाण केले जाणार असून उन्हाळी हंगामात बेळगावच्या वाट्याला एकही नवीन विमानफेरी देण्यात आलेली नाही. 1 एप्रिल ते 26 ऑक्टोबर या कालावधीसाठी डीजीसीएने उन्हाळी हंगामातील वेळापत्रक जाहीर केले आहे. बेळगावमधून दहा शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे. सध्या बेळगावमधून मुंबई, बेंगळूर, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, सूरत, नागपूर, तिरुपती, जोधपूर व जयपूर या शहरांना विमानफेऱ्या सुरू आहेत. इंडिगोने आपल्या सेवांमध्ये कोणताही बदल केला नसला तरी स्टारएअरने वेळापत्रकात काहीसा बदल केला आहे. स्टारएअरने बेळगाव-अहमदाबाद, बेळगाव-मुंबई, बेळगाव-सूरत, बेळगाव-नागपूर, बेळगाव-तिरुपती या मार्गांसह अनेक मार्गांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. बेळगाव-अहमदाबाद विमानफेरी आता दररोजऐवजी आठवड्यातून तीन दिवस निश्चित करण्यात आली आहे. तर बेळगाव-नागपूर विमान तीन दिवसांऐवजी यापुढे आठवड्यात चार दिवस सेवा देणार आहे.
नवीन विमानफेरीची प्रतीक्षाच
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी नवीन सेवा देण्याकडे डीजीसीएने दुर्लक्ष केले आहे. बेळगावमधून चेन्नई, पुणे या शहरांना विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. परंतु, उन्हाळी हंगामामध्ये नवीन एकही फेरी बेळगावच्या वाट्याला आली नसल्याने अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.