राज्य पोलीस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना खडसावले

राज्य पोलीस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना खडसावले

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कडक सूचना
बेळगाव : बेळगावसह राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस महासंचालक डॉ. अलोक मोहन यांनी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कडक शब्दात सुनावले आहे. गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी पोलीस दलाने सतर्क राहावे, अशी सूचनाही राज्य पोलीस महासंचालकांनी केली आहे. हुबळी येथे झालेल्या दोन तरुणींच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात सरकारविरुद्ध निदर्शने झाली. यावेळी पोलीस दलावरही टीकेची झोड उठविली. त्यामुळे पोलीस दलाला अधिक सतर्क बनविण्यासाठी राज्य पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस आयुक्त व सर्व जिल्ह्यांतील जिल्हा पोलीस प्रमुखांशी संवाद साधला आहे. पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस उपायुक्त व एसीपींनी प्रतिदिनी एका पोलीस स्थानकाला भेट द्यावी. यासंबंधीचे फोटो पोलीस ग्रुपवर शेअर करावेत. कर्तव्यावर असताना अधिकाऱ्यांनी गणवेशावरच राहावे. एखाद्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास विलंब करू नये. प्रत्येक प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासकार्य हाती घ्यावे. गुन्हेगारी पार्श्वभूमीची व्यक्ती व त्यांच्या वाहनावर बारकाईने लक्ष ठेवावे.
तक्रारी घेऊन पोलीस स्थानकात येणाऱ्या नागरिकांशी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी सूचना राज्य पोलीस महासंचालकांनी केली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या शहरात व जिल्हा पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जनसंपर्क सभा घेतल्या जात होत्या. अलीकडे जनसंपर्क सभा व बैठकाच बंद झाल्या आहेत. एखाद्या सणाच्या तोंडावर शांतता समितीच्या बैठकीची प्रक्रिया उरकण्यात येते. बहुतेक अधिकाऱ्यांना याविषयी गांभीर्य नसल्यामुळे पोलीस व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी वाढत चालली आहे. ही दरी कमी व्हावी, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरून वारंवार प्रयत्न केले जातात. अलीकडे ते प्रयत्नही थांबले आहेत. गेल्या आठवड्यात किणये येथील एका तरुणीच्या घरावर दगडफेकीची घटना घडली होती. या तरुणीचे कुटुंबीय एफआयआर दाखल करण्यासाठी त्याचदिवशी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पोहोचले. त्यावेळी उद्या बघू, असे सांगत त्यांना परत पाठविण्यात आले होते. अनेक पोलीस स्थानकात असे चित्र रोजच पाहायला मिळते. त्यामुळे गुन्हेगारी घटना वाढत चालल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेत राज्य महासंचालक पोलिसांनी बेळगावसह राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या आहेत.