शिवरायांचा इतिहास आज पुन्हा जागणार

शिवरायांचा इतिहास आज पुन्हा जागणार

शिवचरित्रावरील देखावे, ढोल-ताशा, मर्दानी खेळांचे घडणार दर्शन
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी बेळगावमध्ये भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. शनिवार दि. 11 रोजी सायंकाळी 6 नंतर चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग, सजीव देखावे, समाज प्रबोधनात्मक देखावे, मर्दानी खेळ, ढोल-ताशांचा गजर शनिवारी बेळगावमध्ये पाहता येणार आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने वैशाख द्वितीयेला शिवजयंती साजरी होते. शिवजयंतीच्या तिसऱ्या दिवशी चित्ररथ मिरवणूक काढली जाते. दरवर्षी 30 ते 40 चित्ररथ काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला जातो. याबरोबरीनेच 10 ते 15 ढोल-ताशा पथक, ध्वजपथक, मर्दानी खेळ, झांजपथक, वारकरी भजन यांची सांगड घातलेली असते. त्यामुळे केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, चंदगड, गोवा येथील शिवभक्तांसाठी ही एक पर्वणीच असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी रस्ते गर्दीने फुलून जातात. सायंकाळी 5.30 वाजता नरगुंदकर भावे चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन केले जाणार आहे. त्यानंतर पालखी काढून मिरवणुकीला प्रारंभ होईल. एकामागून एक चित्ररथ मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत.
चित्ररथ मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग…
शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता नरगुंदकर भावे चौक येथून पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होईल. नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूलमार्गे कपिलेश्वर मंदिराजवळ चित्ररथ मिरवणुकीची सांगता होणार आहे.
शहापूरमध्ये आज शिवजयंती चित्ररथ मिरवणूक : सायंकाळी 6 वाजता होणार सुरुवात
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरच्यावतीने शनिवार दि. 11 रोजी चित्ररथ मिरवणुकीतील पहिल्या चित्ररथाचे पूजन केले जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे पूजन करून चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याठिकाणी व्यासपीठ उभारले जाणार असून चित्ररथांचे स्वागत केले जाणार आहे. तरी महामंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्तांनी उपस्थित रहावे. तसेच शहापूर येथून निघणाऱ्या चित्ररथांचा मार्ग शहापूर, खडेबाजार, छत्रपती शिवाजी उद्यानमार्गे शामाप्रसाद मुखर्जी रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, शनिमंदिर, स्टेशन रोड, सेंट मेरीजवळून उभा मारुती व धर्मवीर संभाजी चौकात मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सर्व शिवजयंती मंडळांनी याची नोंद घेऊन शांततेत मिरवणूक पार पाडावी, असे आवाहन अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केले आहे.