आर्थिक वर्षाची सुरुवात तेजीसोबत

आर्थिक वर्षाची सुरुवात तेजीसोबत

सेन्सेक्स 363 अंकांनी वधारला, सेन्सेक्स, निफ्टीचा सर्वकालीक उच्चांकाला स्पर्श
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार मजबुतीसोबत बंद झाला होता. सेन्सेक्सने 363 अंकांची तेजी राखली असून सलग तिसऱ्या सत्रात शेअरबाजार तेजीसोबत बंद झाला आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 363 अंकांच्या वाढीसोबत 74014 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 144 अंकांच्या वाढीसह 22462 या स्तरावर बंद झाला. नव्या आर्थिक वर्षातील शेअरबाजाराचा पहिला दिवस होता. याचदरम्यान निफ्टी निर्देशांकाने 22530 अंकांपर्यंत पोहोचत सर्वकालिक  उच्चांकाला स्पर्श केला होता. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सचा निर्देशांक 500 अंकापर्यंत वाढलेला होता. सेन्सेक्सचा निर्देशांकदेखील 74254 हा नवा उच्चांकी स्तर गाठण्यामध्ये यशस्वी झाला होता.
समभागांचा विचार करता जेएसडब्लू स्टील, टाटा स्टिल, डिव्हीज लॅब्ज, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्टस्, अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन टूब्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीसोबत बंद झाले होते. आयशर मोटर्स, टायटन, नेस्ले इंडिया, बजाज ऑटो, एलटीआय माईंड ट्री, भारती एअरटेल आणि हिरो मोटोकॉर्प यांचे समभाग मात्र घसरणीसोबत बंद झाले. टाटा स्टील, अदानी पोर्टस्, लार्सन टूब्रो आणि ग्रासिम इंडस्ट्रीज यांच्या समभागांनी 52 आठवड्यानंतर उच्चांकी स्तर गाठण्यामध्ये यश मिळविले.
सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतीतही तेजी दिसून आली. तेल उत्पादक देशांकडून उत्पादनामध्ये कपातीचे धोरण आणि रशियातील रिफायनरीवर केलेला हल्ला यामुळे तेलाच्या किंमती वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. अदानी समुहातील 10 लिस्टेड कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे समभाग तेजी दर्शवित व्यवहार करत होते. अदानी एनर्जी सोल्युशनचा समभाग सर्वाधिक 9 टक्के वाढलेला होता. तर एनडी टीव्ही आणि अदानी विल्मर यांचे समभाग 6 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले हेते.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 समभाग तेजीसोबत बंद झाले तर 10 समभाग नकारात्मक कामगिरी करत बंद झाले. धातू आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जास्त करून बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. जेएसडब्ल्यू, टाटा स्टील यांचे समभाग 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढलेले होते. सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल सोमवारी 4.7 लाख कोटी रुपयांवर वाढून 391.67 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.