दहशतवादी हस्तकांना शोपियानमधून अटक

दहशतवादी हस्तकांना शोपियानमधून अटक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या शोपियान पोलिसांनी शनिवारी वाहन तपासणीदरम्यान दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून संशयास्पद साहित्यही जप्त केले आहे. पुंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि विशेष कृती दलाच्या जवानांकडून शोधमोहीम राबवली जात असताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात हिरापोरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. सदर हस्तक कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते यासंबंधीची माहिती त्यांच्या जबानीतूनच स्पष्ट होणार आहे. सध्या सुरक्षा दलाकडून यासंबंधीची माहिती देण्यात आलेली नाही.
सांबामध्ये पाकिस्तानी ड्रोन
जम्मू-काश्मीरमधील सांबामध्ये शुक्रवारी रात्री पाकिस्तानचे ड्रोन घुसल्याचा प्रकारही उघड झाला आहे. बीएसएफच्या जवानांनी तातडीने कारवाई करत ड्रोनवर गोळीबार केला. सुमारे 24 राउंड फायरिंग केल्यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत परतले. या घटनेनंतर बीएसएफने शनिवारी सकाळी रामगड सेक्टर आणि आसपासच्या भागात शोधमोहीम राबवली. मात्र, कोणतीही शस्त्रे किंवा ड्रग्ज ड्रोनमधून सोडण्यात आल्याचे वृत्त नाही.