स्वायटेक, किज उपांत्यपूर्व फेरीत

स्वायटेक, किज उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ रोम
एपीटी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या इटालियन खुल्या पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक तसेच अमेरिकेची मॅडिसन किज, कोको गॉफ यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया अझारेंका, ओस्टापेंको व झेंग यांनीही पुढील फेरीत स्थान मिळविले आहे. पुरूषांच्या विभागात रशियाचा मेदव्हेदेव, फ्रान्सचा मुल्लेर तसेच ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉर यांनीही प्रतस्पिर्ध्यावर विजय नोंदविले आहेत.
महिलांच्या एकेरीतील सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकने जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचा 7-5, 6-3 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. अमेरिकेच्या मॅडिसन किजने सोरेना सिरेस्टीवर 6-2, 6-1 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्वायटेक आणि किज यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने पाओला बेडोसाचा 5-7, 6-4, 6-1, अमेरिकेच्या डॅनिली कॉलिन्सने बेगुचा 6-0, 6-3, द्वितीय मानांकित साबालेंकाने स्विटोलिनाचा 4-6, 6-1, 7-6 (7-5) असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
पुरूषांच्या विभागात या स्पर्धेतील विद्यमान विजेता रशियाच्या मेदव्हेदेवने सर्बियाच्या मेजेडोव्हिकचा 7-6 (7-5), 2-6, 7-5 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. मेदव्हेदेवचा पुढील फेरीतील सामना अमेरिकेच्या टॉमी पॉलशी होणार आहे. टॉमी पॉलने डॉमनिक कोफेरवर 6-4, 6-3 अशी मात केली. रशियाच्या रुबलेव्हला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. फ्रान्सच्या मुलेरने रुबलेव्हचा 3-6, 6-3, 6-2, ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरने कॅनडाच्या अॅलिसिमेचा 6-7 (2-7), 6-4, 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेत हुरकेझ, सित्सिपेस, बायेझ, जेरी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले आहेत.