केरळमध्ये 33 विद्यार्थ्यांचे निलंबन कायम

केरळमध्ये 33 विद्यार्थ्यांचे निलंबन कायम

निलंबन मागे घेण्याचा आदेश रद्द : राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर कुलगुरुंचा राजीनामा
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये पशूचिकित्सा आणि पशूविज्ञान महाविद्यालयाकडून 33 विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याचा देण्यात आलेला आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्तक्षेपानंतर निलंबन मागे घेण्याचा आदेश रद्द झाला आहे. संबधित विद्यार्थी हे केरळमधील सत्तारुढ माकपच्या विद्यार्थी शाखेचे सदस्य आहेत. राज्य सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द झाल्याचा आरोप चहुबाजूने झाला होता.
मागील महिन्यात एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 33 विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली होती. याची माहिती मिळताच राज्यपाल खान यांनी पशूचिकित्सा आणि पशूविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु पी. सी. ससिंद्रन यांना सर्व निलंबित विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याचा आदेश रद्द करण्याचा निर्देश दिला होता.
राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर ससिंद्रन यांनी निलंबन मागे घेण्याचा आदेश रद्द केला. परंतु निर्माण झालेला वाद पाहता ससिंद्रन यांनी त्वरित स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी अद्याप ससिंद्रन यांच्या राजीनाम्यावर कुठलाच निर्णय घेतलेला नाही. राज्यपाल खान यांनी 2 मार्च रोजी ससिंद्रन यांची विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली होती.
विद्यार्थी सिद्धार्थनचा मृतदेह 18 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या वसतिगृहात लटकलेल्या स्थितीत आढळून आला होता. माकपची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी सिद्धार्थचे रॅगिंग केले होते. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची घोषणा केली होती.