रविवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी

रविवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी

शैक्षणिक साहित्यासह किराणामाल खरेदीला जोर
बेळगाव : यात्रा-जत्रा, लग्नसराई आणि शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने रविवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणपत गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौकात नागरिकांची वर्दळ वाढली होती. रविवारी शासकीय सुटी असल्याने बालचमूसह नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली. मागील काही दिवसांपासून यात्रा-जत्रा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. कपडे, भांडी आणि इतर किराणा साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बाजारात उलाढालही वाढू लागली आहे. त्याबरोबरच मान्सूनही तोंडावर आला आहे. त्यामुळे पावसाळी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग पाहावयास मिळत आहे. छत्री, रेनकोट, टोप्या, जॅकेट आणि प्लास्टिक कागद व चप्पल खरेदी केल्या जात आहेत. रविवारी सायंकाळी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढली होती. शैक्षणिक वर्षालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांची बुकस्टॉल आणि स्टेशनरी दुकानांमध्ये गर्दी पाहावयास मिळाली. त्याबरोबरच लहान वर्गातील विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदीलाही पसंती दिली. वह्या, पेन, पुस्तक, बॅग, वॉटर बॅग, गणवेश आदी शैक्षणिक साहित्याची खरेदी झाली. त्यामुळे बाजारात एकूणच रविवारी गर्दी पाहावयास मिळाली.