मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्विमर्स, अॅक्वेरियस क्लबचे यश

मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्विमर्स, अॅक्वेरियस क्लबचे यश

लक्ष्मण, धर्मराज, लोकाप्पा यांचे यश
बेळगाव : हैदराबाद येथे पेन इंडिया मास्टर्स गेम्स फेडरेशन आयोजित पहिल्या फेडरेशन चषक मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्विमर्स व अॅक्वेरियस क्लब बेळगावच्या ज्येष्ठ जलतरणपटूंनी 5 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. हैदराबाद येथील गचिबोवली आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात आयोजित केलेल्या फेडरेशन चषक मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबचे मास्टर्स जलतरणपटू लक्ष्मण कुंभार यांनी 3 सुवर्ण, धर्मराज बी. शिंदे यांनी 2 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य तर एन. लोकाप्पा यांनी 2 रौप्यपदके पटकाविली. 25 ते 95 वयोगटातील मास्टर्स जलतरण स्पर्धेत विविध राज्यातून जवळपास 500 हून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता. या जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, अविनाश पोतदार, माखी कपाडीया, लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.