श्रीदामबाबाचा गुलालोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा

श्रीदामबाबाचा गुलालोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा

मडगाव : जांबावली येथील श्री दामबाबाचा गुलालोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत काल मंगळवारी साजरा करण्यात आला. श्री दामबाबाचे असंख्य भाविक गुलालोत्सवात सहभागी होण्यासाठी काल दुपारपासूनच जांबावलीत दाखल झाले होते. दुपारी 3.30 वाजता ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय’च्या जयघोषात व ढोल-ताशांच्या वादनात दामबाबाच्या पालखीवर गुलाल उधळण्यासाठी हजारो हात सरसावले व संपूर्ण परिसर एका क्षणातच गुलाबी झाला. पालखीवर गुलाल उधळल्यानंतर भाविकांनी पाणट्यावर जाऊन आंघोळ केली. रात्री उशिरापर्यंत श्रीदामबाबाच्या दर्शनासाठी भाविकांची जांबावलीत गर्दी होती. गुलालोत्सवानंतर रात्री 11 वा. ‘नवरदेवाची वरात’ निघाली. त्यानंतर रात्री 12 वा. सदाबहार संगीताचा कार्यक्रम ‘संगीत सभा’ संपन्न झाला. बुधवार दि. 3 रोजी सकाळी 10 वा. होणाऱ्या ‘धुळपेट’ने जांबावलीच्या शिशिरोत्सवाची सांगता होईल.
मठग्रामस्थांसाठी एक पर्वणीच! 
श्रीदामबाबाच्या शिशिरोत्सवाला बुधवारपासून सुऊवात झाली होती. गेले सात दिवस विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आले. श्रीदामबाबाचा शिशिरोत्सव म्हणजे मठग्रामस्थांसाठी एक पर्वणीच असते. अनेक मठग्रामस्थांचा मुक्काम जांबावलीत होता. आज धुळपेट झाल्यानंतर मठग्रामस्थ पुन्हा मडगावात परतणार आहेत. काल गुलालोत्सवानिमित्त मडगावची बाजारपेठ संध्याकाळच्या सत्रात बंद होती. गेल्या कित्येक वर्षाची ही परंपरा अत्यंत प्रामाणिकपणे जोपासली जात आहे.