मऊसागर एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर आल्याने कर्मचाऱ्यांची धांदल

मऊसागर एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर आल्याने कर्मचाऱ्यांची धांदल

पणजी : मुंबईच्या दिशेने जात असलेल्या मऊसागर एक्सप्रेसच्या चाकांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन मोठा धूर येऊ लागल्याची घटना थिवीम स्थानकानजीक घडली. सोमवारी दुपारी 1.15 वा. सुमारास घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे पोलीस, कर्मचारी यांची एकच धांदल उडाली. मात्र काही वेळातच आगीवर नियंत्रण आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला. मुंबईच्या दिशेने जात असलेली एर्नाकुलम-मऊसागर एक्सप्रेस (12977) करमळी स्थानकातून मार्गस्थ झाली. थिविम स्थानकाच्या साधारण 10 किमी अलिकडे असताना गाडीच्या एस 1, एस 2, एस 3 या बोगींच्या चाकांमधून धूर येत असल्याचे मोटरमन आणि गाडीमधील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. काही वेळातच धूर मोठ्या प्रमाणात येऊ लागला. याबाबत मोटरमनने कल्पना दिल्यानुसार आरपीएफ आणि केआरपीची टिम तातडीने ‘अलर्ट’ झाली. गाडी थिवीम स्थानकात येताच आरपीएफ आणि केआरपीच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर हालचाल कऊन आग विझविली. सुदैवाने थिविम स्थानकापासून नजीकच घटना घडल्याने व ती वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. घडल्या प्रकारामुळे प्रवाशांना काहीही त्रास झाला नसल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आग विझवण्यासाठी आरपीएफचे उपनिरीक्षक एम. पी. सिंग, कॉन्स्टेबल जीतराम गुर्जर, विशाल, वासिम यांनी विशेष प्रयत्न केले.