शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याला लाभणार लोकोत्सवाची किनार !

शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याला लाभणार लोकोत्सवाची किनार !

दुर्गराज रायगडावर 6 जूनला अवतरणार शिवशाही : संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती, सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक, 11 वाजता पालखी सोहळा, 5 रोजी युद्धकला, शाहिरीची कार्यक्रम, महोत्सव समिती अध्यक्ष संदीप खांडेकर यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी

‘राज्याभिषेक‘ हा शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे सुवर्णपान. यवनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रासह भारतभूमीला पहिलं स्वातंत्र्य मिळाल्याची अनुभूती देणारा ही हाच राज्याभिषेकाचा क्षण. दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवरायांचा 6 जून 1674 ला ‘राज्याभिषेक‘ झाला. थाटामाटात झालेल्या या सोहळ्यातून सार्वभौम राज्य स्थापन झाले. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती जपणे हे कर्तव्य समजून 6 जूनला रायगडावर भव्य स्वऊपात शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्यात ‘धार तलवारीची-युद्धकला महाराष्ट्राची‘, ‘जागर शिवशाहीरांचा-स्वराज्याच्या इतिहासाचा‘, ‘सोहळा पालखीचा-स्वराज्याच्या ऐक्याचा‘ आदी आयोजित केले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेकदिन महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
रायगडावर 5 व 6 जूनला या कालावधीत होणाऱ्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे सांगून खांडेकर म्हणाले की, 5 जूनला सायंकाळी पाच वाजता होळीचा माळ येथे ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची‘ हा शिवकालीन युद्धकलांच्या प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होईल. यामध्ये महाराष्ट्रातील युद्धकला आखाड्यांचे मावळे पट्टा, तलवार, भाला, विटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गदका आदी शस्त्रs कशी चालवतात हे जवळून पाहता येणार आहे. सायंकाळी 7 वाजता राजसदरेजवळ ‘जागर शिवशाहीरांचा-स्वराज्याच्या इतिहासाचा‘ हा शाहीरीकार्यक्रम आयोजित केला जाईल.
खांडेकर पुढे म्हणाले की, 6 जून रोजी छत्रपती शिवरायांचा पुतळा विराजमान असलेल्या मेघडंबरीजवळ शिवराज्याभिषेकदिन सोहाळा साजरा होईल. यामध्ये सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केला जाईल. यानंतर पुतळ्यास सुवर्ण नाण्यांचाही अभिषेक करण्यात येईल. 11 वाजता राजसदर येथे ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा‘ हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाअंतर्गत बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मियांच्या सहभागाने शिवरायांचा पालखी मिरवणूक आयोजित केला जाईल. या मिरवणूकीत पारंपरिक लोककलांचा जागर होणार आहे. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्र मंदिर अशा पालखी मार्गावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
पत्रकार परिषदेस महोत्सवस समिती कार्याध्यक्ष हेमंत साळुंखे, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, समितीचे माजी अध्यक्ष. फत्तेसिंह सावंत, आरोग्य कमिटीचे उदय घोरपडे, शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ कमिटीचे प्रवीण हुबाळे, शाहीर कमिटीचे दिलीप सावंत, सचिव अमर पाटील, समितीचे प्रसन्न मोहिते, अजयसिंह पाटील, धनाजी खोत, दीपक सपाटे, अनुप महाजन, रणजीत पाटील, पूनम गायकवाड-पाटील सुशांत तांबेकर व श्रीकांत शिरोळे आदी उपस्थित होते.
रायगडावरील शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याची रुपरेषा अशी :
5 जून
दु. 3.30 वा. : राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ (स्थळ : जिजाऊ समाधी, पाचाड)
दु. 4 वा. : संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांच्यासोबत शिवभक्त पायी गड चढण्यास प्रारंभ. (स्थळ : नाणे दरवाजा)
दु 4. 30 वा : महादरवाजाला तोरण बांधणे.
सायं 5. 00 वा. : शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडपूजन. यावेळी 21 गावातील सरपंच व पंचक्रोशीतील गावकऱ्यांची उपस्थिती. (स्थळ : नगारखाना)
सायं. 7 वा. : आतषबाजी.
रात्री 9. 00 वा. : गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ. (स्थळ : शिरकाई मंदिर)
रात्री 9. 30 वा. : जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाकडून किर्तन व भजन.
6 जून
सकाळी 7.00 वा. : रणवाद्यांच्या जयघोषात शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहन (स्थळ : नगारखाना)
स. 7.30 वा. : शाहिरी कार्यक्रम. (स्थळ : राजसदर)
स. 9.50 वा. : युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व राजसदरेवर आगमन
स. 10.30 वा. : संभाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांना संबोधन.
दु. 12.00 वा. जगदीश्वर मंदिर दर्शन
दु. 12.10 वा. : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन !