शेअरबाजार घोटाळा, जेपीसी चौकशी व्हावी : राहुल गांधी

शेअरबाजार घोटाळा, जेपीसी चौकशी व्हावी : राहुल गांधी

नरेंद्र मोदी-शाह यांच्या वक्तव्यांचा केला उल्लेख : गुंतवणुकदारांचा 30 लाख कोटीचा तोटा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
शेअरबाजारात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेल्या मोठी पडझड झाली होती. यामुळे गुंतवणुकदारांना सुमारे 30 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला होता. याप्रकरणी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेअरबाजारात निकालाच्या दिवशी झालेल्या प्रचंड घसरणीवरून निशाणा साधत राहुल गांधी यांनी भारतीय शेअरबाजाराच्या इतिहासात सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा करत याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशी व्हावी अशी मागणी गुरुवारी केली आहे. प्रथम गृहमंत्री शाह यांनी 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर शेअरबाजार मोठी झेप घेईल असा दावा केला होता. मग त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअरबाजारात विक्रमी तेजी येणार असल्याचे म्हणत लोकांना समभाग खरेदी करण्याचा सल्ला दिला. तर त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही शेअरबाजार मोठी उसळी घेणार असल्याचे नमूद पेले होते.
पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांना भाजपला 220 च्या आसपास जागा मिळणार याचा अनुमान होता, परंतु बनावट एक्झिट पोल्सद्वारे लोकांमध्ये खोटे दावे करण्यात आले. एक्झिट पोल्सच्या अनुमानानंतर त्वरित शेअरबाजाराने मोठी उसळी घेत सर्व उच्चांक मोडीत काढले, परंतु 4 जून रोजी शेअरबाजार कोसळला, असे राहुल गांधींनी नमूद पेले आहे. निवडणूक निकालापूर्वी शेअरबाजारात मोठी तेजी होती, परंतु निकालाच्या दिवशी शेअरबाजारात मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणुकदारांना 30 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले. हा पैसा 5 कोटी किरकोळ गुंतवणुकदारांचा आहे. याप्रकरणी चौकशी व्हायला हवी असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. स्टॉक मार्केट क्रॅश होण्यामागे एक गुन्हेगारी कृत्य असल्याचा दावा करत काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला गुंतवणुकीचा सल्ला का दिला असा प्रश्न उपस्थित केला आहे. 5 कोटी परिवारांना समभाग खरेदी करण्यासाठी का सांगण्यात आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 3 जून रोजी शेअरबाजाराने मोठी उसळी घेतली होती आणि गुंतवणुकदारांना 13.7 लाख कोटी रुपयांचा नफा झाला होता. जवळपास सर्व एक्झिट पोल्समध्ये भाजपला मोठा विजय मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु 4 जून रोजी निकाल स्पष्ट होऊ लागताच शेअरबाजार कोसळला होता.
अदानी मुद्द्यापेक्षा अधिक व्यापक
शेअरबाजारात घडलेला हा प्रकार अदानी मुद्द्यापेक्षा अधिक व्यापक आहे. हा अदानी मुद्द्याशी निगडित देखील आहे. हा थेट पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित आहे. या दोघांकडे आयबी अहवाल असतो, तसेच विविध प्रकारचा डाटा असतो. अशास्थितीत ते किरकोळ गुंतवणुकदारांना समभाग खरेदीचा सल्ला कसा देऊ शकतात? हे यापूर्वी कधीच घडले नव्हते. पंतप्रधानांनी यापूर्वी शेअरबाजारावर कधीच वक्तव्य केले नव्हते.  मोदींनीच शेअरबाजार उसळी घेणार असल्याचे म्हटले होते, तसेच त्यांच्याकडे एक्झिट पोल चुकीची असल्याची माहिती होती असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. गुप्तचर यंत्रणांनी भाजपला 200-220 जागा मिळणार असल्याचा अहवाल दिला होता असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.