मशाल चिन्हावर लढण्यास ठाकरेंचा आग्रह…नकार दिल्यानेच हातकणंगेलमध्ये उमेदवार दिला- राजू शेट्टी

मशाल चिन्हावर लढण्यास ठाकरेंचा आग्रह…नकार दिल्यानेच हातकणंगेलमध्ये उमेदवार दिला- राजू शेट्टी

कोणत्याही राजकिय पक्षाच्या ओसरीला जाव लागू नये म्हणून मी स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाची स्थापना केली. आणि त्याच्या आधारावरच मी निवडणूक लढवत आलो. पण महाविकास आघाडीमध्ये सामिल होण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी माझ्यापुढे मशाल चिन्हावर लढण्याची अट ठेवली होती. मशाल चिन्हावर लढल्याने मी शेतकऱ्यांनी आणि माझ्या संघटनेला वाऱ्यावर कसं काय सोडू अशी भावनिक साद घालत मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिल्यानेच हातकणंगले मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
संपुर्ण राज्यामध्ये चर्चिल्या गेलेल्या आणि सांगली आणि कोल्हापूरच्या राजकिय तिढ्यामुळे भिजत घोंगडे पडलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे चित्र आज अखेर स्पष्ट झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हातकणंगले मतदारसंघासाठी उमेदवार दिला असून त्यामुळे हि लढत आता चौरंगी होणार आहे. माजी आमदार सुजित मिणचेकर आणि सत्यजित पाटील यांच्यामधील तिकिटासाठीच्या चुरशीच्या लढतीमध्ये सत्यजित पाटील यांनी बाजी मारली. माजी आमदार सत्यजित पाटील- सरूडकर हे आता लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत.
स्वता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या घोषणेनंतर हातकणंगले तालुक्यातील राजकिय घडामोडी गतीमान झाल्या असून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी या संदर्भात एक व्हिडीयो व्हायरल करून ठाकरे गटावर आरोप केले आहेत. आपली बाजू मांडताना राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहनही केले आहे.
अचानक काहीतरी घडले आणि निरोप आला…
आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा आणि भाजपच्या विरोधातील होणारी संभाव्य मतविभागणी टाळावी असा आग्रह लोकांनी केला होता. महाविकास आघाडीचे नेतेही सातत्याने हातकणंगलेमध्ये आम्ही उमेदवार देणार नसून ती जागा स्वाभिमानीला सोडणार असल्याचे म्हणत होती. त्यामुळेच मी दोनवेळा मी उद्धवजी ठाकरे यांना भेटलो असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अधिक माहीती सांगताना ते म्हणाले, या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांना काही अंशी ते पटलेलं सुद्धा होतं. परंतु अचानक काय झालं मला माहिती नाही. त्यानंतर निरोप आला की तुम्ही मशाल या चिन्हावर लढलं पाहीजे.सध्याची परिस्थिती पहाता मशाल हे चिन्ह शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालं असून त्या चिन्हावर लढणं याचा अर्थ मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणं असाच होतो. 30 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे पटणारं नाही. असे प्रत्युत्तर त्यांनी दिलं.
…त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडी सोडली
स्वाभिमानी शेतकरी संघटना 2021 मध्येच महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती आणि त्याचं कारण तीन तुकड्यांमध्ये केलेली एफआरपी आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांवर फिरवलेला वरवंटा या दोन धोरणात्मक बाबीला विरोध म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोडली होती. त्यानंतर राज्य कार्यकारिणीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाशी अधीन राहून गेल्या तीन वर्षापासून लोकसभेच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारी आम्ही केली होती.
स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भुमिका पहिल्यापासूनच….
यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “हातकणंगले मतदारसंघातून ठाकरें गटाकडून उमेदवार जाहीर केला असून तो त्यांचा निर्णय आहे. मात्र स्वतंत्र लढायची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतली होती. शेतकऱ्यांचा आवाज, सामान्यांचा आवाज, गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवायचा जबाबदारी आता शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे. आपण लढू आणि आपण नक्कीच जिंकू अशी खात्रीही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.