‘आयोडीन’च्या नावाखाली भेसळ मिठाची विक्री

‘आयोडीन’च्या नावाखाली भेसळ मिठाची विक्री

आहार सुरक्षितता प्राधिकारकडून सौंदत्ती, यरगट्टी, अथणी, रायबाग येथील विविध दुकानांमध्ये मिठांच्या पाकिटांची तपासणी
प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या आहारामध्ये मिठाला अतिशय महत्त्व आहे. मिठाशिवाय पदार्थ बेचव लागू शकतो. त्यामुळे मिठाशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. अलीकडे आरोग्याबाबत जागृती वाढल्याने आयोडीनयुक्त मीठ खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. परंतु अशा मिठामध्ये खरोखरच आयोडीन असतो का? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचे कारण म्हणजे आहार सुरक्षितता प्राधिकारने ब्रँडेड मिठाची प्रयोगशाळेत चिकित्सा केली असता त्यामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे.
काही दशकापूर्वी समुद्रात तयार होणारे खडेमीठच वापरात येत होते. ते एकाचवेळी खरेदी करून वर्षभर त्याची साठवण केली जात असे. मात्र अलीकडच्या काहीकाळात विविध ब्रँडची क्रेझ निर्माण झाली आणि त्यामध्ये मीठही अपवाद राहिले नाही. मात्र या मिठामध्ये आवश्यक असणारे पोषक घटक मात्र कमी प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे.
आहार सुरक्षितता प्राधिकारच्या अधिकाऱ्यांनी सौंदत्ती, यरगट्टी, अथणी, रायबाग येथील विविध दुकानांमध्ये मिठांच्या पाकिटांची तपासणी केली असता चार नमुन्यांच्या ब्रँडेड मिठाच्या पाकिटावर लिहिलेली पोषक मूल्ये मिठामध्ये नसल्याचे स्पष्ट झाले. तर एका ब्रँडचे मीठ खाण्यायोग्य नसल्याचेही स्पष्ट झाले. असे असुरक्षित मीठ आरोग्यासाठी घातक आहे.
नियमांचे उल्लंघन करून कंपन्यांनी जर उत्पादन केले असेल, दुकानदारांना ते उत्पादन पोहोचविणारे एजंट व अशा उत्पादनाची विक्री करणारे दुकानदार हे तिघेही दोषी ठरविण्यात येतात. आहार सुरक्षितता प्राधिकार याबाबत न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात आणि आरोप सिद्ध झाल्यास न्यायालय कारवाई करू शकेल आणि अशा घटना, प्रकरणांमध्ये संबंधितांना कारागृहाची हवा खावी लागते.
सरकारच्या आदेशवजा सूचनेनुसार तपासणी मोहीम
 डॉ. जगदीश (अन्न सुरक्षा अधिकारी)
सरकारच्या आदेशवजा सूचनेनुसार दर आठवड्याला तपासणी मोहीम हाती घेण्यात येते. यापूर्वी गोबीमंच्युरी, बॉम्बे मिठाई अशा पदार्थांची सुरक्षितता तपासण्यात आली आहे. आयोडीन मिठाच्या नावाखाली भेसळ मिश्रित मीठ विकले जात होते. त्यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.