रिझर्व्ह बँकेने गाठली ‘नव्वदी’

रिझर्व्ह बँकेने गाठली ‘नव्वदी’

90 रुपयांच्या विशेष नाण्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचे चलन असणाऱ्या ‘रुपया’वर नियंत्रण ठेवणारी भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘नव्वदी’त प्रवेश केला आहे. 1 एप्रिल 2024 या दिवशी या बँकेने 90 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच 90 रुपयांच्या एका विशेष नाण्याची घोषणाही अर्थविभागाने केली. या विशेष नाण्याचे अनावरणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ब्रिटीश शासनाच्या काळात 1 एप्रिल 1935 या दिवशी करण्यात आली होती. भारतासाठी अशी बँक असावी अशी सूचना हिल्टन यंग आयोगाने त्याच्या अहवालात केली होती. हा अहवाल 1934 मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर 1934 मध्येच ब्रिटनच्या संसदेने ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट’ नामक कायदा संमत केला होता. या कायद्याच्या अंतर्गत या बँकेची स्थापना करण्यात आली होती. भारताच्या चलनी नोटा आणि नाणी यांचे नियमन करणे, वित्तीय स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी स्वत:कडे विशिष्ट प्रमाणात चलनसाठा राखणे आणि भारताची आर्थिक पत आणि चलन व्यवस्थापन भारताच्या हिताच्या दृष्टीने सुनिश्चित करणे अशी तीन ध्येये या बँकेसाठी निर्धारित करण्यात आली होती, अशी माहिती या निमित्त देण्यात आली आहे.
आधी कोणती संस्था होती?
रिझर्व्ह बँकेच्या आधी भारताच्या चलनाचे व्यवस्थापन ‘चलन नियामक मंडळा’कडून (कंट्रोलर ऑफ करन्सी) करण्यात येत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाल्यानंतर या मंडळाचे सर्व उत्तरदायित्व या बँकेच्या हाती सोपविण्यात आले होते. तेव्हापासून आजवर याच बँकेकडून भारताच्या चलनाचे सर्व व्यवस्थापन आणि नियंत्रण केले जात आहे. नव्या नोटा छापणे आणि नवी नाणी निर्माण करण्याचे काम याच बँकेचे आहे. देशाच्या अर्थकारणात बँकेने नेहमीच महत्वाची भूमिका निभावली आहे, अशी प्रशंसा तज्ञांनी केली आहे.