रालोआ घटकपक्षांचा मोदींवरच विश्वास

रालोआ घटकपक्षांचा मोदींवरच विश्वास

‘नेतेपदी’ निवड : सत्तास्थापनेच्या हालचालींना गती : 7 जूनला राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘एनडीए’ म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बुधवारी दुपारी दिल्लीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ‘रालोआ’च्या नेत्यांनी अधिकृतपणे नरेंद्र मोदींची ‘एनडीए’चे नेते म्हणून एकमताने निवड केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती भवनात जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला असून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळण्याची सूचना केली आहे.
एनडीएला बहुमत मिळाले असले तरी भाजप स्वबळावर बहुमतापासून दूर आहे. अशा परिस्थितीत आता फक्त नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार एनडीएला 292 जागांवर समाधान मानावे लागले, तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या. दोन्ही आघाड्यांमधील मोठ्या पक्षांपैकी भाजपला 240 तर काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. अशा स्थितीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासह इतर घटकपक्षांच्या साथीने नवीन सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सध्या नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एनडीएसोबत असल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना ब्रेक लागलेला आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजता एनडीएची बैठक झाली, तर ‘इंडिया’ आघाडीची बैठक 6 वाजता पार पडली.
रालोआच्या नेत्यांची बैठक
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा सुपूर्द केला असून आता नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत रालोआमधील घटकपक्षांच्या नेत्यांनी मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच पुरेसे संख्याबळ असल्यामुळे लवकरच सत्तास्थापन करण्याचा आग्रहही व्यक्त केला. रालोआच्या नेत्यांची गरीब, महिला, तऊण, शेतकरी आणि समाजातील वंचित घटकांची सेवा करण्यासाठी आघाडी सरकारची बांधिलकी अधोरेखित करणारा ठराव एनडीएच्या नेत्यांनी मंजूर केला. आता लवकरच राष्ट्रपतींची भेट घेऊन रालोआचे नेते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवार, 7 जून रोजी भाजपसह सहकारी पक्षांचे नेते राष्ट्रपतींची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर शनिवारी किंवा रविवारी पंतप्रधानपदासाठी शपथविधी होणार असल्याचे समजते.
जेडीयू एनडीएमध्येच राहणार
बिहारचे मंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) चे ज्येष्ठ नेते विजय कुमार चौधरी यांनी आपला पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच आपला पक्ष बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवर ठाम राहील आणि बिहारच्या आर्थिक स्थिती व अर्थव्यवस्थेशी संबंधित काही मागण्या केंद्र सरकारसमोर विचारार्थ मांडत राहू, असेही त्यांनी पुढे सांगितले.
 
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा
पंतप्रधानांच्या निवासस्थानी बुधवारी नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सध्याची लोकसभा विसर्जित करण्याच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेत राजीनामा सादर केला. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारत नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाला नवीन सरकार कार्यभार स्वीकारेपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली आहे. तसेच राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारच्या सर्व विद्यमान मंत्र्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे.
राष्ट्रपतींकडून 17वी लोकसभा विसर्जित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी 17 वी लोकसभा विसर्जित केली. राष्ट्रपती भवनाकडून यासंबंधी माहिती जारी करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी 5 जून 2024 रोजी मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारला असून घटनेच्या कलम 85 च्या कलम (2) मधील उपखंड (बी) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केला आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपणार असून तत्पूर्वी नवे सरकार स्थापन केले जाणार आहे.