राजकीय प्रचारासाठी रोहयो कामगारांवर दबाव

गावपातळीवरील पुढाऱ्यांची करामत : सत्तासंघर्षाला कारण, 200 रुपये भत्ताही मिळतोय बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस रंग चढत आहे. राजकीय पक्षांकडून बुथपातळीवर संघटना अधिक बळकट करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर केला जात आहे. गावपातळीवरील राजकीय पुढाऱ्यांकडून राजकीय दबाव घालून रोजगार हमी योजनेतील कामगारांना प्रचारासाठी ओढले जात आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतील कामगार कामाऐवजी […]

राजकीय प्रचारासाठी रोहयो कामगारांवर दबाव

गावपातळीवरील पुढाऱ्यांची करामत : सत्तासंघर्षाला कारण, 200 रुपये भत्ताही मिळतोय
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस रंग चढत आहे. राजकीय पक्षांकडून बुथपातळीवर संघटना अधिक बळकट करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर केला जात आहे. गावपातळीवरील राजकीय पुढाऱ्यांकडून राजकीय दबाव घालून रोजगार हमी योजनेतील कामगारांना प्रचारासाठी ओढले जात आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतील कामगार कामाऐवजी राजकीय पक्षांच्या प्रचारामध्ये दिसू लागले आहेत. अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र आता या योजनेत राजकारण शिरले आहे. रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांचा प्रचारासाठी दबाव घालून राजकीय पोळी भाजून घेतली जात आहे. राजकीय पक्षांकडून सध्या बुथपातळीवर तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. या मेळाव्यांना रोजगार हमी योजनेतील कामगार महिलांना हजर राहण्यासाठी दबाव घातला जात आहे. रोजगार हमी योजनेमध्ये गावपातळीवर प्रत्येक 15 ते 20 महिलांचे गट करून त्या गटाला एका महिलेला प्रमुख म्हणून नेमले जाते. त्या महिलेकडून रोजगारासाठी येणाऱ्या महिलांची हजेरी घेतली जाते. सदर हजेरी ग्राम पंचायतीला दिली जाते.
या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या महिलांच्या गटांचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला जात आहे. रोजगार हमी योजनेतील वेतनासह राजकीय पक्षांच्या मेळाव्यासाठी हजर झाल्यानंतर 200 रुपये भत्ता दिला जात आहे. मेळाव्याला कारणे सांगून हजर न राहणाऱ्या कामगारांना रोजगारचा एनएमआर उपलब्ध करून देताना टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाला राजकीय पक्षाच्या मेळाव्याला सक्तीने हजर रहावे लागत आहे. कामगारांना भत्ता, जेवण, इतरही आमिषे दाखविली जात असल्याने पोळी मिळेल तिथे टाळी देत आहेत. गावपातळीवरील नेत्यांकडून अशाप्रकारे राजकीय दबाव घालून स्वार्थ साधला जात आहे. ग्रामीण भागात सध्या हा प्रकार वाढीस लागल्याने सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षाच्या पुढारी व विरोधकांमध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षाच्या आमदारांना खूश करण्यासाठी गावपातळीवरील ग्राम पंचायत सदस्यांकडून अशा प्रकारांना खतपाणी घातले जात आहे. रोजगार हमीतील कामगारांना मेळाव्यासाठी बोलावून प्रचार केला जात आहे. ही वृत्ती वाढीस लागल्याने गावपातळीवर राजकीय सत्तासंघर्ष निर्माण होऊ लागला आहे.