लोकसभा अध्यक्षपदासाठी पुरंदेश्वरींचे नाव चर्चेत

लोकसभा अध्यक्षपदासाठी पुरंदेश्वरींचे नाव चर्चेत

चंद्राबाबू नायडूंचा पाठिंबा मिळण्याची शक्यता : भाजपकडून विचार सुरू
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटपही जाहीर झाले आहे. आता सर्वांच्या नजरा लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार याकडे लागून राहिल्या आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन 24 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसल्याने रालोआतील सहकाऱ्यांच्या बळावर सरकार स्थापन झाले आहे. रालोआत भाजपनंतर चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा संजद सर्वात मोठा पक्ष ठरल्याने लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारावरून विविध कयास वर्तविले जात आहेत. अशा स्थितीत भाजप खासदार डी. पुरंदेश्वरी यांचे नाव या पदासाठी चर्चेत आले आहे.
तेदेपने लोकसभा अध्यक्षपदासाठी  यापूर्वीच दावा सांगितला आहे. तर संजद देखील पदाची मागणी करत आहे. याचदरम्यान भाजप लोकसभा अध्यक्ष पद स्वत:कडे ठेवणार असल्याची चर्चा असून याकरता आंध्रप्रदेश भाजप अध्यक्ष दुग्गुबति पुरंदेश्वरी यांचे नाव समोर आलेआहे. पुरंदेश्वरी या राजमुंदरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्ष केले तर तेदेप आणि चंद्राबाबू नायडू आक्षेप घेणार नसल्याचे भाजपचे मानणे आहे. आंध्रप्रदेशात तेदेप आणि जनसेनेसोबत भाजपची आघाडी करण्यास पुरंदेश्वरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दुग्गुबति पुरंदेश्वरी माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांच्या कन्या आहेत. तसेच चंद्राबाबू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या भगिनी आहेत. पुरंदेश्वरी तीनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी बापतला आणि विशाखापट्टणम मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. त्यापूर्वी त्या आणि त्यांचे पती दुग्गुबति वेंकटेश्वर राव हे चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत होते आणि त्यांनी मिळून 1996 मध्ये एन.टी. रामाराव यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले होते.
त्यानंतर नायडू यांनी तेदेपवर पूर्ण नियंत्रण मिळवत पुरंदेश्वरी आणि वेंटकेश्वर राव यांना बाजूला केले होते. या घटनेमुळे नाराज पुरंदेश्वरी यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्या राज्यमंत्री होत्या. परंतु आंध्रप्रदेशच्या विभाजनच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे नाराज होत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षात राष्ट्रीय महासचिव करण्यात आले होते.
पाठिंबा मिळण्याची शक्यता
पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यास नायडूंकडून विरोध होण्याची शक्यता कमी आहे. एक तर त्या त्यांच्या नातेवाईक आहेत, तसेच कधीकाळी त्या चंद्राबाबू यांच्या समर्थक राहिल्या आहेत. तसेच भाजप-तेदेप आघाडीकरता त्यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.