प्रज्ञानंदचा कार्लसनवर पुन्हा विजय

प्रज्ञानंदचा कार्लसनवर पुन्हा विजय

वृत्तसंस्था/ वॉर्सा
भारताच्या आर. प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनवर आणखी एक विजय मिळवून सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. दुसरीकडे चीनच्या वेई यीने ग्रँड चेस टूरचा एक भाग असलेल्या या स्पर्धेतील आपली आघाडी 2.5 गुणांनी वाढवली.
ब्लिट्झ स्पर्धेत नऊ फेऱ्या बाकी असताना वेई यीने ब्लिट्झच्या पहिल्या दिवशी सात विजयांसह 20.5 गुणांची कमाई केली. एखाद्या वादळासारखा तो प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत गेला आणि ग्रँड चेस टूरचा पहिला टप्पा जिंकण्यास तो सज्ज झाला आहे. कार्लसन 18 गुणांनिशी या टप्प्यावर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे प्रज्ञानंद आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या या खेळाडूवर हल्लीच्या काळात खेळाच्या वेगवान आवृत्तीमध्ये  प्रज्ञानंदने बऱ्याच वेळा मात केली आहे.
मात्र भारतीय खेळाडू 14.5 गुणांसह आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा खूप मागे आहे. यामुळे विजेतेपदासाठी दोनच खेळाडूंमध्ये शर्यत लागलेली आहे. चौथ्या स्थानावर भारताचा अर्जुन इरिगाईसी 14 गुणांसह आहे, तर पोलंडचा डुडा जॅन-क्रिझटॉफ 13 गुणांसह त्याच्या मागे आहे. उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह 12.5 गुणांसह सहाव्या स्थानावर असून जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर आणि रोमानियाचा किरिल शेवचेन्को हे अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.
हॉलंडचा अनीश गिरी 10.5 गुणासह नवव्या स्थानावर आहे, मात्र जागतिक विजेतेपदाचा आव्हानवीर बनलेल्या डी. गुकेशला ब्लिट्झ स्पर्धेत संघर्ष करावा लागलेला आहे. तो 9.5 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. वेई यीने दिवसाची सुऊवात गुकेशविऊद्धच्या पराभवाने केली, परंतु उर्वरित सात लढती जिंकून आणि कार्लसनविऊद्धची लढत बरोबरीत सोडवून त्याने वेळीच पुनरागमन केले. गुकेशसाठी चांगली सुऊवात करूनही हा दिवस कठीण गेला. तो एकूण फक्त 2.5 गुण मिळवू शकला. प्रज्ञानंद व गुकेशवर विजय मिळवून अर्जुनने आपले आव्हान जिवंत राहील याची काळजी घेतली. वेई यी व कार्लसन यांच्याकडून पराभूत झालेल्या अर्जुनने त्याच्या इतर लढतींत पाच विजय नोंदविले आणि दोन सामने बरोबरीत सोडविले.