पोलंडची स्वायटेक चैथ्यांदा ‘फ्रेंच सम्राज्ञी’

पोलंडची स्वायटेक चैथ्यांदा ‘फ्रेंच सम्राज्ञी’

कार्लोस अल्कारेझ-व्हेरेव आज अंतिम लढत
वृत्तसंस्था/ पॅरीस
2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शनिवारी महिला एकेरीच्या अजिंक्यपदासाठीच्या अंतिम लढतीत पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने इटलीच्या नवोदित जस्मीन पावोलिनीचा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद पटकाविले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वायटेक चौथ्यांदा प्रेंच सम्राज्ञी ठरली आहे. स्पेनचा कार्लोस अल्कारेझ आणि जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव यांच्यात रविवारी पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात टॉप सिडेड स्वायटेकला विजय मिळविण्यासाठी अधिक झगडावे लागले नाही. स्वायटेकने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिल्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या इटलीच्या जस्मीन पावोलिनीचा 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये केवळ 68 मिनिटात पराभव करत जेतेपद मिळविले. स्वायटेकने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा सलग तीनवेळा जिंकून हॅट्ट्रिक साधली आहे. स्वायटेकच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे पाचवे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या अंतिम सामन्यात स्वायटेकने आपल्या बेसलाईन खेळाच्या जोरावर पहिला सेट केवळ 37 मिनिटात जिंकला. या सेटमध्ये स्वायटेकने दोनवेळा पावोलिनीची सर्व्हिस भेदत 4-0 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर तिने हा सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र पावोलिनीला केवळ एक गेम जिंकता आला. वयाच्या 28 व्या वर्षी पावोलिनीने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
पुरुष एकेरीच्या झालेल्या अटीतटीच्या उपांत्य लढतीत अल्कारेझने इटलीच्या जेनिक सिनेरचा 2-6, 6-3, 3-6, 6-4, 6-3 अशा पाच सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीमध्ये अल्कारेझ सुरुवातीला दोन सेट्सने पिछाडीवर होता. त्यानंतर मात्र त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर तसेच वेगवान सर्व्हिस आणि बेसलाईन खेळावर भर देत सिनेरचे आव्हान संपुष्टात आणले. हा उपांत्य सामना चार तास चालला होता. इटलीच्या सिनेरने या उपांत्य लढतीमध्ये दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविले पण त्याला 21 वर्षीय अल्कारेझच्या वेगवान फोरहँड फटक्यांना तोंड देता आले नाही. 2022 साली झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अल्कारेजने विजेतेपद मिळवले होते. ही स्पर्धा हार्डकोर्टवर खेळवली गेली होती. तसेच त्याने गेल्या वर्षीच्या ग्रासकोर्टवरील  विम्बल्डन स्पर्धेत दर्जेदार खेळ केला होता. पॅरीसच्या रोलँड गॅरो रेड क्ले कोर्टवर रविवारी अल्कारेझ आणि जर्मनीचा चौथा मानांकित व्हेरेव यांच्यात जेतेपदासाठी चुरशीची लढत होणार आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवने नॉर्वेच्या सातव्या मानांकित कास्पर रुडचा 2-6, 6-2, 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. या लढतीमध्ये रुडने पहिला सेट जिंकून आघाडी मिळविली होती पण त्यानंतर पुढील तीन सेटमध्ये त्याला आपली सर्व्हिस अधिकवेळ राखता आली नाही. तसेच व्हेरेवच्या जमिनीलगतच्या फटक्यांमुळे त्याच्याकडून वारंवार चुका झाल्या. बेसलाईन खेळावर भर देत व्हेरेवने रुडचे आव्हान संपुष्टात आणले. प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत यावेळी राफेल नदाल, सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविच किंवा रॉजर फेडरर दिसणार नाहीत. जोकोविच या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. त्याला यावेळी दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली.