परळी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आंघोळ…. !!! रेल्वे बोगीतील पाण्याच्या टाकीला गळती, शॉवर सारखा फवारा प्रवाशांच्या अंगावर

परळी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आंघोळ…. !!! रेल्वे बोगीतील पाण्याच्या टाकीला गळती, शॉवर सारखा फवारा प्रवाशांच्या अंगावर

प्रतिनिधी/मिरज: मिरज-परळी डेमू एक्सप्रेसच्या एका बोगीत अचानक पाण्याची टाकी फुटली. शॉवर सारखा थंड पाण्याचा फवारा प्रवाशांच्या अंगावर उडाला. शनिवारी ही घटना घडली. टाकीला गळती लागल्यामुळे सुमारे दोनशे लिटर पाण्याची नासाडी झाली. विशेष म्हणजे गळतीची दुरूस्ती न करता प्रवाशांना भिजवत एक्सप्रेस धावत होती. रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना रंगपंचमीच्या दिवशी रेल्वेतून भिजत प्रवास करावा लागला. रेल्वेने प्रवाशांसोबत रंगपंचमी साजरी केली असावी, असा टोमणाही प्रवाशांनी मारला. पाण्याचा फवारा अंगावर येत असल्याने अनेक प्रवाशांना दुसऱया बोगीत जावून बसावे लागले.
मिरज-परळी डेमू एक्सप्रेस (गाडी क्र. 11412) नियमित वेळेत शनिवारी रात्री नऊ वाजता मिरज जंक्शनवर आली. पूर्वी ही गाडी मिरज ते परळी असा प्रवास करीत होती. मात्र, या गाडीचा सांगलीपर्यंत विस्तार झाल्याने ही गाडी मिरज स्थानकावर उशिरापर्यंत थांबलेली नव्हती. मिरज स्थानकावरुन प्रस्थान करीत असतानाच पाठीमागून तिसऱया क्रमांकावर असलेल्या बोगीत प्रवाशी शौचालयाच्या वरील बाजूच्या पाण्याच्या टाकीला अचानक गळती लागली.
आधीपासूनच या बोगीत अनेक प्रवाशी बसले होते. सुरुवातीला एकधारेत असलेली गळती काही वेळानंतर शॉवरसारखा फवारा मारु लागली. काही वेळानंतर एकाच टाकीला तीन ते चार ठिकाणी गळती सुरू झाल्याने रेल्वेत पावसासारख्या पाण्याच्या धारा लागल्या. अनेक प्रवाशी भिंजले. त्यांच्या बॅगा, कपडेही भिजले. संपूर्ण बोगीत पाण्याचा लोंडा पसरला. पाण्याच्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या. काही प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱयांना माहिती दिली. मात्र वेळेअभावी गळतीची तात्काळ दुरूस्ती होऊ शकली नाही. परिणामी टाकीला लागलेल्या गळतीसह परळी एक्सप्रेस निर्धारीत मार्गाकडे प्रस्थान झाली.
या प्रकारामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला. ऐन रंगपंचमीच्या दिवशी रेल्वेने प्रवाशांसोबत रंगपंचमी केली असावी, असा टोमणाही प्रवाशांनी मारला. टाकीला लागलेल्या या गळतीमुळे सुमारे दोनशे ते अडीचशे लिटर पाण्याची नासाडीही झाली. संपूर्ण बोगीत पाण्याचा फवारा उडाल्याने प्रवाशांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागले. दुसऱया बोगीत बसायलाही जागा नव्हती तरीही प्रवाशांना दुसऱया बोगीत मिळेल त्या जागेत बसावे लागले. प्रवासादरम्यान टाकी रिकामी झाल्यानंतर गळती थांबली.
चौकट
ही कसली तत्पता?
परळी एक्सप्रेसमध्ये पाण्याच्या टाकीला गळती लागली, ही रेल्वे अधिकाऱयांच्या दृष्टीने किरकोळ बाब असल्याचे रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणातून दिसून आले. याचबरोबर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा मॉकड्रील पुरतीच आहे का? असा सवाल प्रवाशांनी केला. पाण्याच्या गळतीसह रेल्वे धावत होती. गळतीच्या ठिकाणी आग लागली असती तर रेल्वे अधिकाऱयांनी हाच निष्काळजीपणा दाखवला असता का? असा सवालही उपfिस्थत झाला आहे. परळी पॅसेंजर मिरज जंक्शनवरुन सुटत असताना तिची देखभाल दुरूस्ती केली जात होती. मात्र, या गाडीचा सांगलीपर्यंत विस्तार झाल्यामुळे नियमित देखभाल दुरूस्तीसाठी ही गाडी मिरज जंक्शनवर उशिरापर्यंत थांबत नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप प्रवाशांतून होत आहे.