बोपन्ना, नागल यांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचे टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि सुमित नागल यांनी येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले आहे. एटीपीच्या मानांकनानुसार बोपन्ना आणि नागल यांना कोटा पद्धतीनुसार पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी टेनिस या क्रीडा प्रकारासाठी सोमवारी पात्र फेरीची खिडकी बंद झाली. एटीपीच्या ताज्या मानांकनात रोहन बोपन्नाने दुहेरीत चौथे स्थान […]

बोपन्ना, नागल यांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि सुमित नागल यांनी येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले आहे. एटीपीच्या मानांकनानुसार बोपन्ना आणि नागल यांना कोटा पद्धतीनुसार पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी टेनिस या क्रीडा प्रकारासाठी सोमवारी पात्र फेरीची खिडकी बंद झाली. एटीपीच्या ताज्या मानांकनात रोहन बोपन्नाने दुहेरीत चौथे स्थान मिळविल्याने त्याला कोटा पद्धतीनुसार पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट आरामात मिळाले. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून दुहेरीच्या प्रकारात टेनिसपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत त्यांना मानांकन देण्यात आले. या दुहेरीच्या मानांकनात पहिल्या 10 जोड्यांना पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सुमित नागलचे स्थान 18 अकांनी वधारले. गेल्या रविवारी नागलने जर्मनीत एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धा जिंकली. त्यामुळे नागलचे एटीपी मानांकनातील स्थान वधारले. त्याने 95 व्या स्थानावरुन 77 व्या स्थानावर झेप घेतली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिस या क्रीडा प्रकारात पुरुष आणि महिलांच्या एकेरी प्रकारात प्रत्येकी 64 टेनिसपटूंचा सहभाग राहिल. 10 जून रोजी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या एकेरीच्या मानांकनातील पहिल्या 56 खेळाडूंना कोटा पद्धतीनुसार ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. प्रत्येक देशाला कमाल 4 टेनिसपटूंनी कोटा पद्धतीनुसार पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले आहे. ऑलिम्पिकचे यजमानपद फ्रान्स भूषवित असल्याने त्यांना कोटा पद्धतीनुसार एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. यजमान फ्रान्सने पुरुष एकेरीमध्ये कोटा पद्धतीनुसार 4 जागा मिळविल्या आहेत. सुमित नागलने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या जानेवारीमध्ये सुमित नागल एकेरीच्या मानांकनात 138 व्या स्थानावर होता. मात्र चालू वर्षाच्या प्रारंभी त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखत पहिल्या 100 टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविले. नागलने चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिस या क्रीडा प्रकारात दुहेरीत पुरुष आणि महिलांच्या विभागात प्रत्येकी 32 जोड्या सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी रोहन बोपन्ना श्रीराम बालाजीला आपला दुहेरीतील साथिदार म्हणून निवडण्याची शक्यता वर्तविली जाते. 44 वर्षीय बोपन्नाने गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. तसेच त्याने गेल्या आठवड्यात फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. 2012 ची लंडन ऑलिम्पिक तसेच 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बोपन्नाने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. पण 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला आपली पात्रता सिद्ध करता आली नाही.