किशोरवयीन मुले गांजाच्या आहारी गेल्याने पालक हतबल

किशोरवयीन मुले गांजाच्या आहारी गेल्याने पालक हतबल

पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी : शालेय स्तरावर समुपदेशन होणे गरजेचे
खानापूर : शहरासह तालुक्यात किशोरवयीन मुले गांजासह इतर अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने किशोरवयीन तसेच युवा पिढी उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर असल्याने पालक चिंताग्रस्त बनले आहेत. नुकताच शैक्षणिक अभ्यास क्रमाला सुरवात झाली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांनी गजबजून जात आहेत. याचवेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. अनेक पालक या व्यसनाधिनतेमुळे हतबल झाले असून, याबाबत पोलिसानी कठोर कारवाई करण्याची मागणीही पालक वर्गातून होत आहे. शहरासह तालुक्यात गेल्या काही वर्षापासून किशोरवयीन मुले गांजासह इतर अंमली पदार्थांच्या व्यसनात गुंतली गेली आहेत. यात माध्यमिक विद्यालयाची मुले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाधिन बनली आहेत. त्यामुळे ही मुले व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक गैरप्रकार करत आहेत. तसेच व्यसनाच्या पूतर्तेसाठी लहानसहान चोऱ्याही करत आहेत. सुरवातीला गांजा व इतर व्यसनांची सुरवात महाविद्यालयातून माध्यमिक शाळेपर्यंत पोहोचले. आज तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळेतील विद्यार्थी या गांजाच्या आहारी गेल्यामुळे अनेक पालकांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
किशोरवयीन दशेतच ही मुले गांजाच्या इतक्या आहारी गेलेत की, आपण काय करतोय याचेही भान या मुलांना नाही. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी हे दारू आणि गांजा या दोन्ही व्यसनाच्या आहारी गेल्याने तरुण पिढीच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शहराच्या रेल्वेस्टेशन, मन्सापूर रोड, नदीघाट, मलप्रभा क्रीडांगणाचा परिसर, पारिश्वाड क्रॉस परिसर, राजा टाईल्स परिसर तसेच नव्याने तयार झालेल्या महामार्गालगत यासह अनेक ठिकाणीही व्यसनाधिन मुले एकत्र येऊन गांजासह इतर व्यसन करत आहेत. शहरासह ग्रामीण भागात गांजा आणि इतर अंमलीपदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने ही किशोरवयीन मुले या व्यसनाकडे आकर्षित झाली आहेत. पोलीस प्रत्येक वेळी जुजबी कारवाई करून जबाबदारी झटकत आहेत. पोलिसानी याबाबत कठोर भूमिका बजावल्यास शहरासह तालुक्यातील गांजा विक्रीला आळा बसणार आहे. यासाठी पोलिसांकडून कारवाई होणे गरजेचे आहे.
युवक व्यसनातून बाहेर येणे गरजेचे
व्यसनाधिन झालेली मुले तंटे, मारामारी तसेच व्यसनाची तलप भागविण्यासाठी छोट्या मोठ्या चोऱ्याही करत आहेत. त्यामुळे युवकांचे भविष्याच अंधकारमय बनले आहे. मुलांचे आई-बाप हतबल झालेले आहेत. या व्यसनात अनेकांनी आपले जीवही गमावलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील युवक या व्यसनातून बाहेर येणे गरजेचे आहे. यासाठी शालेय स्तरावर समुपदेशनाची गरज आहे. यासाठी शालेय व्यवस्थापकानी, शिक्षकानी, मुख्याध्यापकानी याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. तसेच यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे. अन्यथा किशोरवयीन मुले व्यसनाधिन बनून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी गांभीर्याने घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गांजा विक्रेत्यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाळे
याबाबत पोलिसांकडून कोणतीच कठोर कारवाई होताना दिसत नाही. खानापूर तालुक्यात मटका, गांजा विक्री, राजरोसपणे सुरू आहे. या विरोधात पोलिसांकडून जुजबी कारवाई केल्याचे दाखवण्यात येते. मात्र ज्याच्यावर कारवाई होते तो अवघ्या आठ दिवसातच जामिनाररवर सुटून येतो. गांजा विक्रेत्यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. व्यसन करणाऱ्यांपर्यंत गांजा योग्य पद्धतीने पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे ही युवा पिढीच या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अनेक पालक हतबल झाले आहेत. अशी अवस्था निर्माण झाल्याने पोलिसांकडून या गांजा विक्रीला निर्बंध घालणे गरजेचे आहे.