हिंडलगा कारागृहात आढळल्या आक्षेपार्ह वस्तू

हिंडलगा कारागृहात आढळल्या आक्षेपार्ह वस्तू

पोलिसांची तब्बल तीन तास तपासणी मोहीम : चाकू, गांजा, चार्जर जप्त
बेळगाव : बेळगाव पोलिसांनी रविवारी सकाळी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात तपासणी केली. त्या तपासणीत गांजा, चाकू, चार्जर, ब्लू टूथ डिव्हाईस आढळून आले असून यामुळे एकच खळबळ माजली आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारागृहात आक्षेपार्ह वस्तू आढळल्याने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20(बी)(2)ए व कलम 424, 42, कर्नाटक कारागृह दुरुस्ती कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनिंग यांनीही कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. रविवारी सकाळी 6 वाजता पोलीस पथक कारागृहात शिरले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु., बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., खडेबाजाराचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्यासह 5 पोलीस निरीक्षक, 11 उपनिरीक्षक, 146 हून अधिक हवालदार व पोलिसांचा या पथकात समावेश होता. तपासणीसाठी मेटल डिटेक्टर व श्वानपथकाचाही वापर करण्यात आला. एकाच वेळी संपूर्ण कारागृहातील बराकींमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. महिला कैद्यांच्या बराकीत तपासणी करण्यासाठी महिला पोलीस व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी 9 पर्यंत ही तपासणी चालली. तब्बल तीन तास झालेल्या कारवाईनंतर आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. उपलब्ध माहितीनुसार कारागृहात 5 चाकू, 20 ग्रॅम गांजा, पक्कड, कात्री, नेलकटर, फोल्डींग चाकू, तंबाखू व खैनी, केबल वायर, चार मोबाईल चार्जर, एअरबड्स बॉक्स, पाचशे रुपयांच्या 14 नोटा, शंभरच्या 3 व पन्नास रुपयाची एक नोट असे एकूण 7,390 रुपये रोख रक्कम, लायटर आढळून आले आहे. कारागृहात या वस्तू वापरण्यास निर्बंध असूनही मोबाईल चार्जरसह अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्याचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सांगितले.
आक्षेपार्ह वस्तू कारागृहात कशा पोहोचल्या?
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना हिंडलगा कारागृहातील जयेश पुजारी या कैद्याने खंडणीसाठी धमकावल्यानंतर कारागृह ठळक प्रकाशात आले होते. त्यानंतर दोन वेळा तपासणी करूनही पोलिसांच्या हातात काहीच मिळाले नव्हते. तिसऱ्या कारवाईत गांजा, चाकू आदी वस्तू आढळल्या आहेत. या वस्तू कारागृहात कशा पोहोचल्या? याचा तपास करण्यात येत आहे.