न्यूझीलंडची गाठ आज अफगाणशी

न्यूझीलंडची गाठ आज अफगाणशी

वृत्तसंस्था/ प्रोव्हिडन्स (गयाना)
न्यूझीलंड आज शनिवारी येथे होणार असलेल्या गट ‘क’मधील सामन्यात आयपीएल स्टार्सनी भरलेल्या अफगाणिस्तान संघाविरूद्ध टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुऊवात करेल. यावेळी आत्मसंतुष्ट होऊन त्यांना चालणार नाही. न्यूझीलंडला कठीण गटात स्थान मिळालेले असून दोन वेळचे विजेते वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांचे त्यांना गटात पहिली दोन स्थाने प्राप्त करण्याच्या बाबतीत आव्हान राहणार आहे.
पावसाने सरावावर मर्यादा आणल्यामुळे या प्रमुख स्पर्धेसाठी न्यूझीलंडची तयारी आदर्श झालेली नाही. तथापि, आयसीसी स्पर्धांत न्यूझीलंडची ताकद ही त्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता राहिली आहे. फिन अॅलन आणि रचिन रवींद्रसारखे युवा खेळाडू तसेच अनेक अनुभवी खेळाडू या संघात आहेत. न्यूझीलंडच्या फलंदाजीमध्ये खोली असून गोलंदाजीमध्ये विविधता आहे. ट्रेंट बोल्ट नवीन चेंडूवर वर्चस्व गाजवेल आणि लॉकी फर्ग्युसन तसेच टिम साउदी यांची त्याला साथ मिळेल. डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरची कॅरिबियन भूमीतील कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे.
दुसरीकडे, अफगाणिस्तानने त्यांच्या सलामीच्या लढतीत युगांडावर दणदणीत विजय मिळवलेला आहे. त्यात रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान या सलामीच्या जोडीने चांगली सुऊवात करून दिली, तर वेगवान गोलंदाज फझलहक फाऊकी, नवीन-उल-हक आणि कर्णधार रशिद खान यांनी प्रभावी मारा केला. पण गुरबाज व झद्रान वगळता इतर फलंदाजांपैकी कोणीही टिकू शकले नाही. मजबूत किवी संघाविऊद्ध त्यांना यात सुधारणा करून आणखी चांगली कामगिरी करावी लागेल.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वा.