मोदींचे गोव्यावरील प्रेम कायम श्रीपादभाऊंची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी

मोदींचे गोव्यावरील प्रेम कायम श्रीपादभाऊंची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी

मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार, जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव 
पणजी : उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकून विजयाची डबल हॅटिट्रक साधलेले श्रीपाद नाईक यांचा पहिल्याच यादीत केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे रविवारी गोव्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या समावेशामुळे त्यांच्यावर समाजाच्या सर्व घटकांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रीपाद नाईक यांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. त्यांचा हा सलग सहावा विजय आहे. त्यामुळे मोदी मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागेल असा ठाम विश्वास गोव्यातील राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत होता. काल त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून तो क्षण प्रत्यक्ष पाहिला तेव्हा गोमंतकीयांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले.
काल रविवारी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 8.30 च्या सुमारास श्रीपाद नाईक यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा गोव्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नाईक यांच्यासह केंद्रातील विविध दिग्गज नेत्यांनीही शपथ घेतली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत दोन दिवस आधीच दिल्लीत पोहोचले होते. त्यांच्यासोबत खासदार सदानंद तानावडे यांचाही समावेश होता. श्रीपाद नाईक यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याचे दुपारीच मुख्यमंत्र्यांना समजले होते. त्यामुळे त्यांनीच सर्वप्रथम नाईक यांचे अभिनंदन केले. त्यानंतर मंत्री सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, आलेक्स सिक्वेरा यांच्यासह आमदार दिगंबर कामत आणि इतरांनीही नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार
नाईक यांनी सांगितले की आपणाला पुन्हा एकदा संधी मिळेल याची खात्री होती. ज्या प्रमाणे आपण आजवर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली आहे तशीच ती यापुढेही स्वीकारत पुढे जाणार आहे, असे ते म्हणाले.
श्रीपादभाऊ नाईक यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाचा गोवा, गोमंतकीय जनतेला निश्चितच मोठा फायदा होईल. मोदीजींच्या तिसऱ्या कार्यकाळात गोव्याला प्रतिनिधीत्व मिळणे ही आमच्यासाठी खरोखरच आनंददायी बाब आहे.
– मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
केंद्राने गोव्याच्या एकमेव भाजप खासदाराची नोंद घेऊन गोव्याच्या जनतेला न्याय दिला. श्रीपादभाऊंबद्दल आम्हा तमाम गोमंतकीयांना अभिमान वाटतो.  त्यांना खूप खूप शुभेच्छा.
खासदार सदानंद शेट तानावडे

खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली सोनिया, राहुल गांधी यांची भेट
दरम्यान, दक्षिण गोव्यातून विजयी झालेले खासदार विरियातो फर्नांडिस यांनी आपल्या दिल्ली भेटीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचीही उपस्थिती होती. दक्षिण गोव्यात उत्कृष्ट कामगिरी बजावताना मिळविलेल्या विजयाबद्दल दोन्ही नेत्यांनी विरियातो यांचे अभिनंदन केले. विरियातो यांनी भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचा सुमारे 13 हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे. या मतदारसंघात दोन्ही चेहरे नवे होते. मात्र त्यात विरियातो यांनी बाजी मारली आहे.