पेन ड्राईव्हबाबतचे पुरावे कुमारस्वामींनी सादर करावेत

पेन ड्राईव्हबाबतचे पुरावे कुमारस्वामींनी सादर करावेत

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी
बेंगळूर : पेन ड्राईव्हबाबत माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडून नको ते आरोप केले जात आहेत. कुमारस्वामी यांच्याकडे पुरावे असतील तर ते मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत, अन्यथा चौकशी करणे अशक्य आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगून एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर निशाणा साधला. बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पुढे ते म्हणाले, पेन ड्राईव्हबाबत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडून नको ते आरोप केले जात आहेत. याबाबत पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे द्यावेत. मुख्यमंत्री आणि कुमारस्वामी यांचा जवळचा परिचय आहे. त्यामुळे पेन ड्राईव्हबाबत कोणतेही पुरावे असल्यास ते त्यांनी सादर करावेत, असे त्यांनी सांगितले. पुरावे नसताना चौकशी करणे शक्य आहे का? असा प्रश्नही त्यांनी केला. कुमारस्वामी यांच्या म्हणण्यानुसार तलावात म्हैस सोडून व्यवहार करणे असा अर्थ होतो. त्यामुळे प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी त्यांच्याजवळ असणारे पुरावे सादर केल्यावरच याची सखोल चौकशी होऊ शकते, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेतल्यासंदर्भात विचारले असता, निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. किती जागांवर विजय मिळू शकतो, याबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री पदावरून निवडणुकीदरम्यान आवाज उठविण्यात आला होता. आता उपमुख्यमंत्री पदावरून कोणताच आवाज नाही. उगीच सरकार पाडविण्याचे सांगितले जात आहे, यामध्ये तथ्य नाही, असेही त्यांनी सांगितले.