शताब्दी एका ऐतिहासिक स्मारकाच्या पायाभरणी समारंभाची; लोकसहभागातून उभारलेले राजर्षींचे पहिले स्मारक

शताब्दी एका ऐतिहासिक स्मारकाच्या पायाभरणी समारंभाची; लोकसहभागातून उभारलेले राजर्षींचे पहिले स्मारक

सौरभ मुजुमदार कोल्हापूर

विजयादशमीच्या दिवशी राजेशाही थाटात संपन्न होणारा दसरा महोत्सव. त्यामुळेच हा पूर्वीचा चौफाळ्याचा माळ ऐतिहासिक दसरा चौक म्हणून आजही ओळखला जातो. परंतु याच दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहूराजांचा ऐटदार पुतळा आजही त्यांच्या कार्याच्या स्मृती घेऊन उभा आहे. याच ठिकाणावरून चौफेर नजर फिरवल्यास सर्वत्र राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने साकार झालेल्या समाजातील अठरापगड जातींसाठी उभारलेल्या ऐतिहासिक वास्तू आजही सहज नजरेस पडतात. कदाचित त्यामुळेच हे पवित्र ठिकाण या स्मारकासाठी निश्चित केलेले असावे. याच चौकात 12 एप्रिल 1927 रोजी प्रत्यक्षात हा पुतळा अनावरणाचा समारंभ झाला. हत्तींच्या भव्य रथातून राजेशाही थाटात लाखो जनसागराच्या सहभागाने मिरवणुकीने याचे आगमन झालेले होते.
इसवी सन 1924 ची मौल्यवान निमंत्रणपत्रिका व पावती.
संपूर्ण भारतातील लोकसहभागातून उभारलेले राजर्षी शाहू महाराजांचे हे सर्वप्रथम पुतळारुपी स्मारक होय. या स्मारकाच्या पायाचा पहिला दगड बसवण्याचा समारंभ हा आजपासून शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच मंगळवार, 1 एप्रिल 1924 रोजी याच ठिकाणी उत्साहात पार पडला होता. या कार्यक्रमाची विशेष निमंत्रण पत्रिका आजही राधानगरी येथील रहिवासी दत्तात्रय तात्यासो निल्ले यांच्याकडे असून ‘भाऊ नाना निले, सिरोली’ यांना ती देण्यात आली होती, असे दिसून येते. जनतेमार्फत, जनतेकडूनच जनसामान्यांनी आपल्या राजाच्या प्रेमापोटी पै पै गोळा करून उभ्या केलेल्या या स्मारकाच्या पायाभरणी समारंभास संस्थानच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोकांनी त्यावेळी उपस्थिती लावली होती, हेच यावरून समजते.
पायाभरणी समारंभाची दुर्मीळ निमंत्रण पत्रिका व लोकसहभागाचा ऐतिहासिक दस्तऐवज
या दिवशी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी नेक नामदार मुंबईचे गव्हर्नर साहेबबहाद्दूर सर लेस्ली वुइल्सन, जी. सी. आय.इ. यांच्या हस्ते हा दगड बसवण्याचा समारंभ संपन्न होणार असल्याचा तसेच या समारंभापुर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहण्याची विशेष सूचना या दस्तऐवजात असल्याचे समजते. रिसाल्यानजीक ही जागा असून तत्कालीन प्रेसिडेंट पी. घाटगे यांचे नाव इंग्रजीमध्ये या पत्रिकेत सर्वात शेवटी आहे. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या या समारंभाचा हा दस्तऐवज इतिहास संशोधक व अभ्यासक तसेच हजारो शाहूप्रेमींच्या दृष्टीने मौल्यवान आहे. या स्मारकासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे देखील अमूल्य योगदान असून या स्मारकासमोरील एका दगडी तक्क्यावर ते तासन्तास बसून या कामकाजाची पाहणी करत असत, असे अभ्यासकांचे मत आहे.
स्मारकाच्या लोकसहभागाचा महत्त्वपूर्ण दस्ताऐवज
स्मारकासाठी जनता, सरदार, मानकरी, वतनदारांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याची साक्ष देणारी एक दुर्मीळ पावती मुजुमदार घराण्याकडे आजही आहे. कैलासवासी श्रीमंत महाराज शाहू छत्रपती स्मारक फंड कमेटीसाठी रा. रा. मे. बळवंतराव मुजुमदार, रा. आटेगांव यांच्याकडून 18 फेब्रुवारी 1923 रोजी सदर फंडाबद्दल 80 रुपये पोहोचल्याचे या पावतीरुपी दस्ताऐवजावरून उजेडात येते.