फाईलवर स्वाक्षरीची केजरीवालांना नाही परवानगी

फाईलवर स्वाक्षरीची केजरीवालांना नाही परवानगी

ईडीच्या दाव्यामुळे वाढला वाद : सीसीटीव्ही फुटेजचा दिला दाखला : भाजपने केली होती तक्रार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईडीकडून अटक करण्यात आल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या दोन आदेशांवरून वाद वाढला आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर आता ईडीने केजरीवाल यांच्याकडून कोठडीत कुठल्याही आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री सीसीटीव्हीच्या देखरेखीत असून त्यांना सध्या शासकीय फाइल्सवर स्वाक्षरी करण्याची अनुमती नसल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले.
कोठडीत असताना केजरीवाल यांना दरदिनी संध्याकाळी पत्नी तसेच वकिलांची भेट घेण्याची अनुमती आहे. परंतु त्यांना शासकीय फाइल्स पाहण्याची किंवा त्यावर स्वाक्षरी करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या भेटींदरम्यान कुठली स्वाक्षरी करविण्यात आली का याचा तपास आता ईडी करत आहे. तपासात कुठल्याही नियमाचे उल्लंघन आढळून आल्यास 28 मार्च रोजी न्यायालयासमोर संबंधित विषय मांडला जाणार असल्याचे समजते.
अबकारी घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 21 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवालांकडून दिल्ली सरकारला दोन निर्देश मिळाल्याचा दावा काही मंत्र्यांनी केला होता. जलमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या कोठडीत असताना दिल्लीच्या काही भागांमध्ये पाणी आणि सीवरशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्याचा निर्देश दिल्याचा दावा केला आहे. तर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीच्या सर्व रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधांचा पुरवठा निश्चित व्हावा असा निर्देश दिला असल्याचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी मंगळवारी म्हटले आहे.
याप्रकरणी भाजपचे सचिव मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याकडे तक्रार करत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर कशाप्रकारे आदेश जारी होत आहेत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा दुरुपयोग होत असून चुकीच्या पद्धतीने केजरीवालांच्या नावावर आदेश जारी करण्यात येत आहेत असे म्हणत सिरसा यांनी ईडीलाही तक्रारीचे पत्र पाठविले आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी या फेक आदेश सादर करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सिरसा यांनी उपराज्यपालांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा निर्देश कुठल्या माध्यमातून प्राप्त होतोय हे दिल्ली सरकार तसेच आम आदमी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. तर दोन आदेशांपूर्वी केजरीवालांच्या पत्नीने दिल्लीवासियांच्या नावाने त्यांचा एक संदेश वाचला होता. सुनीता केजरीवाल यांना दररोज संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्याची अनुमती प्राप्त आहे.