कंग्राळीतर्फे कल्याणी पाटीलचा सत्कार

कंग्राळीतर्फे कल्याणी पाटीलचा सत्कार

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावची सुकन्या व राष्ट्रीय पातळीवर झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकाविलेली महिला कुस्तीपटू कल्याणी पाटील हिचा कंग्राळी खुर्द ग्रामस्थांच्यावतीने नुकताच भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ पाटील गल्ली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी निवृत्त मुख्याध्यापक टी. डी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कल्याणी पाटील हिने आतापर्यंत कुस्ती खेळात विविध ठिकाणी कसे यश मिळविले याची माहिती दिली. नोयडा (उत्तरप्रदेश) या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करत प्रेक्षणीय कुस्त्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवून बेळगाव व कंग्राळी खुर्दचा लौकीक वाढवला. त्यानंतर कल्याणीच्या हस्ते शिवमूर्तीच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर श्री गणेशोत्सव मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ पाटील गल्ली, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ग्रामपंचायत, तालीम मंडळे, कुस्ती संघटना, गावडे कमिटी, नवजागृती सेवा संघ, श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीमंडळ विठ्ठल रूक्मिणी मंदिर सेवा मंडळ, पारायण मंडळ पाटील परिवार आदी संघटनांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कल्याणीच्या आई वडिलांचा सत्कार
या कार्यक्रमाचे औचित्य साधून कल्याणीचे वडील परशराम पाटील व आई सुजाता पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राम माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, शांताराम पाटील, अनंत पाटील यांनी कल्याणीला रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले. ग्रा. पं. उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, सदस्य यल्लाप्पा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना अशा खेळाडूंच्या पाठीशी आम्ही सदैव असून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कर्नाटक केसरी कृष्णा पाटील, ग्रा. पं. माजी अध्यक्ष भाऊ पाटील, ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजू बेन्नापकर, भैय्या पाटील, जोतिबा पाटील, बाळू पुजारी, रामभाऊ पाटील, आप्पाजी पाटील, किसन पाटील, प्रशांत निलजकर, संजय पाटील, अमोल पाटील, बाबुराव पाटील, मोहन पाटील, शटूप्पा पाटील, निंगोजी पाटील, नारायण पाटीलसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.