इराणचा मिर्झा, जस्सापट्टीने गाजविले अळणावर मैदान

इराणचा मिर्झा, जस्सापट्टीने गाजविले अळणावर मैदान

शिवराज राक्षे, किरण भगत, गायत्री सुतार यांचे प्रेक्षणीय विजय : 50 हजार कुस्ती शौकीनांची उपस्थिती,देवा थापाची प्रात्यक्षिके
अळणावर-बेळगाव : अळणावर येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त राजू मारुती पेजोली यांच्या आश्रयाखाली आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रमुख कुस्तीत इराणच्या मिर्जाने उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटेचा अवघ्या 5 मिनिटाला एकचाक डावावरती चारीमुंड्या चीत केले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने भोला पंजाबचा एकचाक डावावरती अवघ्या 6 व्या मिनिटाला तर हिंदकेसरी जसापट्टीने मनजित खत्रीचा घुटना डावावर प्रेक्षनीय विजय मिळवून उपस्थित 50 हजारहून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकली. तर महिला कुस्तीत कर्नाटक केसरी गायत्री सुतारने इराणच्या मोबिनाचा घिस्सा डावावरती पराभव करून गदेची मानकरी ठरली. प्रमुख कुस्ती विश्वपदक विजेता मिर्झा इराण व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यात होती. पण सिकंदर शेखला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटे यांच्यात कुस्ती राजू पेजोली व अळणावर कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. तिसऱ्याच मिनिटाला माउली कोकाटेने एकेरी पट काढून मिर्जावर कब्जा मिळवून पायाला एकलांगी भरून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी मिर्जाने त्यातून व्यवस्थितपणे सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला मिर्झाने पायाला आकडी लावून माउली कोकाटेला खाली खेत कब्जा मिळवत घिस्सावरती प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या माउलीला घिस्सावर फिरवणे कठीण झाल्याने मिर्झाने एकचाक डावाची आखणी करत लागलीच एकचाक डावावर माउली कोकटेला आस्मान दाखवित उपस्थित कुस्तीशौकीनांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती हिंदकेसरी, भारत केसरी, भारताचा अव्वल मल्ल जस्सापट्टी व भारत केसरी मनजित खत्री ही कुस्ती बेंगळूर येथील मराठा समाजाच्या स्वामी यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला मनजित खत्रीने पायाला टाच मारून जस्सापट्टीला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या जस्सापट्टीने त्यातून सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला जस्सापट्टीने एकेरी पट काढून मनजित खत्रीला खाली घेत पायाला एकलांगी भरून एकलांगीवर फिरवण्याचा प्रयत्न केला. पण मनजित खत्रीने त्यातून सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला जस्सापट्टीने दुहेरी पट काढीत मनजितला खाली घेत मानेवर कस काढून मानेवरती घुटना ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात जस्सापट्टीला चीत करण्यात अपयश आले. पण लागलीच पुन्हा जस्सापट्टीने मजबूत घुटन्याची पक्कड घेऊन मनजित खत्रीला चारीमुंड्या चीत केले. यावेळी कुस्ती शौकीनांनी जस्सापट्टीची कौतूक करीत अभिनंदन केले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व भारत केसरी भोला पंजाब ही कुस्ती अळणावर ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हापंचायत सभासदांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला भोला पंजाबने हप्ते भरून शिवराज राक्षेला खाली घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्या उंचीचा फायदा घेत शिवराजने त्यातून सावरले. सहाव्या मिनिटाला शिवराज राक्षेनी दुहेरी पट काढून भोला पंजाबला खाली घेत घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण घिस्सावरती फिरवणे कठीण गेल्याने शिवराज राक्षेने भोला पंजाबला एकचाक डावाची मजबूत पक्कड घेऊन एकचाक डावावरती चारीमुंड्या चीत करीत वाहव्वा मिळविली.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व मुनिफकुमार हरियाणा या कुस्तीत दुसऱ्याच मिनिटाला मुनिफकुमारने एकेरी पट काढून किरण भगतला खाली घेत एकचाक मारून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी किरण भगतने त्यातून सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला किरण भगतने एकेरी पट काढून मुनिफकुमार खाली घेत एकलांगी भरण्याचे दाखवून घिस्सावरती चीत करून मुनिफकुमार धक्काच दिला. पाचव्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे अमितकुमार हरियाणा यांच्यात झाली. ही कुस्ती डाव प्रतिडावाने जिंकली. पण वेळेअभावी कुस्ती बरोबरीत राहिली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन संजय तानपुरे कर्नाटक केसरी महेश लंगोटीला बाहेरील टांगेवर चीत केले. सातव्या क्रमांकाच्या कुस्ती रोहन घेवडेने रिया इराण यांच्या झाली. या कुस्तीत दोन वेळेला रिया इराणने चीत करण्याची संधी दवडली. वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुनील फडतरेने पवनकुमार दिल्लीचा घिस्सा डावावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन कोळीने शुभम पाटीलवर एकलांगीवर विजय मिळविला. त्याचप्रमाणे नागराज बस्सीडोणी, संगमेश बिराजदार, सागर कोल्हापूर, निखील कंग्राळी यांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून विजय मिळविला. आकर्षक कुस्ती पार्थ पाटील कंग्राळी व प्रितम धारवाड यांच्यात झाली. या कुस्तीत पार्थने प्रितम धारवाडला पायाला एकलांगी घालून चीत करण्याचा प्रयत्न करीत असताना मैदानात पावसाच्या व्यतव्यामुळे ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. महिलांच्या कुस्तीत मानाच्या गद्यासाठी झालेल्या लढतीत कर्नाटक केसरी गायत्री सुतारने इराणच्या मोबिना यांच्यात झाली. पहिल्याच मिनिटाला गायत्रीने एकेरी पट काढून मोबिनेला खाली घेत एकचाक डावावरती पराभव करून मानाच्या गदेचा किताब पटकाविला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती लिना सिदनीने धारवाडचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती साली सिधनीने किर्ती कुंडलेचा पराभव केला. कोल्हापूरच्या आर्या नाईकने धारवाडच्या सिद्धीचा पराभव केला. आखाड्याचे पंच म्हणून मारुती हट्टीकर, रमेश दुष्की, कर्नाटक केसरी कृष्णा पाटील, दशरथ हट्टीकर व इतरांनी काम पाहिले. आखाड्याचे समालोचन शिवकुमार माळी इचलकरंजी व तुकाराम गावडा हल्याळ यांनी केले. ही कुस्ती यशस्वी करण्यासाठी उद्योगपती राजू मारुती पेजोली व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुसळधार पावसाला न जुमानता कुस्ती मैदान उत्साहात
अळणावर येथे रविवारी कुस्ती मैदानाला दुपारी 2 वाजल्यापासून मैदानाला सुरूवात झाली. सायंकाळी 6 च्या सुमारास निम्म्याहून अधिक कुस्त्या पूर्ण झाल्या होत्या. पण अचानक मुसळधार पावसाची आगमनाने कुस्ती शौकीनांत नाराजी पसरली. सैरावैरा होऊन शौकीन मिळेल त्या आसरा घेत चिंब भिजून सुद्धा पुढील कुस्त्या होणार या आशेवर स्तभ राहिले. जणूकाय देवाला या कुस्ती शौकीनांची दया आली आणि सायंकाळी 8 वाजता पुन्हा कुस्त्यांना प्रारंभ झाला. स्थानिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पावसाच्या वेळी संपूर्ण आखाडा प्लॅस्टीकद्वारे झाकून ठेवल्यामुळे हे मैदान पुन्हा सुरू होण्यास मदत झाली. कुस्ती शौकीनांच्या जिद्दीमुळेच हे मैदान यशस्वी पार पडले.
देवा थापाच्या प्रात्यक्षिकामुळे कुस्तीशौकीनात उत्साह
पाऊस येऊन गेल्यानंतर हवेत गारवा निर्माण झाला असताना देवा थापाच्या मनोरंजक कुस्तीमुळे भिजून चिंब झालेल्या कुस्तीशौकीनांच्या उरात उब निर्माण झाली आणि मैदानात एकच आवाज घुमला तो देवा थापाचा. गॅलरीतून महिला व पुरूष मंडळींनी टाळ्यासह घोषणाबाजी करीत आनंद व्यक्त केला. देवा थापाने आपल्या कुस्तीत माकडाच्या गुलाट्याप्रमाणे विरोधी मल्लाला उलट्या सुलट्या उड्या मारायला प्रवृत्त केले. त्यामुळे कुस्तीशौकीनांच्यामधून वेगळीच उत्सुकता निर्माण झाल्याने संपूर्ण मैदान उसळून आले. 20 मिनिटानंतर थापाने आपल्या प्रतिस्पर्धांला उलटी डावावरती चीत करून विजय मिळविला. यावेळी मान्यवरांनी त्याला त्याच्या या मनोरंजक कुस्तीमुळे त्याचे खास कौतुक केले. यावेळी थापाने सर्व कुस्तीशौकीनांना अभिवादन पेले.