स्वरमल्हारच्या बैठकीत पावसासोबतच स्वरांची बरसात

स्वरमल्हारच्या बैठकीत पावसासोबतच स्वरांची बरसात

बेळगाव : स्वरमल्हार फाउंडेशन व सुरेल संवादिनी संवर्धन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैफलीत संवादिनी आणि व्हायोलिनच्या सहवादनाने आणि त्यानंतरच्या पंडित भुवनेश कोमकली यांच्या गायनाने श्रोत्यांना तृप्त केले. पं. संतोष नाहर, दिल्ली आणि डॉ. सुधांशू कुलकर्णी यांच्या व्हायोलिन व संवादिनीच्या जुगलबंदीने बैठकीची दमदार सुऊवात झाली. त्यांनी राग भीमपल्लास अप्रतिमरीत्या सादर केला. प्रथम विलंबित एकतालातील गत नंतर द्रुत त्रितालमधील गत वाजवली. त्या दोन्ही कलाकारांचे सहवादन एकमेकास अत्यंत पूरक होते. एकाहून एक स्वरांच्या सुंदर लडी उलगडून दाखवत भीमपल्लास खूप सुंदररीत्या मांडला आणि वातावरण प्रसन्न केले. त्यानंतर मिश्र्र मांड रागातील केसरिया बालमा ही धून वाजवून त्यांनी सांगता केली. दुसऱ्या सत्रात मंचावर पं. भुवनेश कोमकली स्थानापन्न झाले. बघता बघता त्यांनी बैठकीचा ताबा घेत राग बिहागातील बडा ख्यालने आणखीनच रंग भरायला सुऊवात केली. बिहागातील नंतर घेतलेल्या द्रुत एकतालातील नजाकतदार छोटा ख्यालने मैफल सजवली.
श्रोत्यांची उत्कंठा पराकोटीला पोहचली असताना राग कामोद व नंतर कामोदनट रागातील द्रुत बंदिश सादर करताना नटाचे अंग इतके खुबीने दाखवत होते की  श्रोत्यांचीही त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली. बागेश्री रागातील पं. कुमारजींची ‘टेसुल बन फुले’ या बंदिशीने तर भुवनेशजींनी श्रोत्यांना कुमारजींच्या जगतात नेले. अजून खूप काही ऐकायचे राहून गेले असे वाटत असताना ‘चलो सखी खेले कन्हैया संग होरी’ या होरी गीताने भुवनेशजींनी बैठकीची सांगता केली. पुन्हा येऊन अजून ऐकवतो, असे आश्वासनही त्यांनी बेळगावच्या श्रोत्यांना दिले. संपूर्ण बैठकीला तितकीच नेटकी व रंगतदार साथसंगत धारवाडचे सुप्रसिद्ध तबलावादक श्रीधर मांढरे आणि संवादिनीवादक सारंग कुलकर्णी यांनी केली. बाहेर धुवांधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. तर सभागृहातील श्रोत्यांची मने कलाकारांनी स्वरांची बरसात करत चिंब भिजविली. सुऊवातीला पं. विनोद डिग्रजकर, कोल्हापूर, अॅड. देवदत्त पऊळेकर, वेंगुर्ला, पं. संतोष नाहर, श्रीधर मांढरे, सुधांशु कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कलाकारांचे स्वागत व सन्मान पं. विनोद डिग्रजकर व सुधांशू यांनी केले. सूत्रसंचालन भारती गुरव यांनी केले.