बहुमत सिद्धतेवेळी हेमंत सोरेन हजर राहणार

बहुमत सिद्धतेवेळी हेमंत सोरेन हजर राहणार

न्यायालयाने दिली परवानगी : सोमवारी ‘फ्लोअर टेस्ट’
वृत्तसंस्था /रांची
जमीन घोटाळ्याच्या आरोपाखाली तुऊंगात असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 5 फेब्रुवारी रोजी नव्या सरकारच्या फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. हेमंत सोरेन यांच्या वतीने ए. जी. राजीव रंजन आणि अॅड. प्रदीप चंद्रा यांनी बाजू मांडली. हेमंत सोरेन यांच्यावतीने विधानसभेतील बहुमत चाचणीदरम्यान उपस्थित राहण्याची मागणी करणारी याचिका ईडी न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली. हेमंत सोरेन यांच्या राजीनामा आणि अटकेनंतर झारखंडमध्ये चंपई सोरेन हे मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध झाले आहेत. त्यांच्यासोबतच अन्य दोघांनी शपथ घेतली असून आता सोमवार, 5 फेब्रुवारी रोजी नव्या सरकारला फ्लोअर टेस्टचा सामना करावा लागणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री आलमगीर आलम यांच्याकडे संसदीय कामकाज खाते मिळाले. या खात्याशिवाय इतर सर्व विभाग मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्याकडेच राहतील. याशिवाय सत्यानंद भोक्ता यांना सध्या कोणतेही खाते देण्यात आलेले नाही. 5-6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या दृष्टीने आलमगीर आलम यांना संसदीय कामकाज खाते देण्यात आले आहे. मंत्रिमंडळ समन्वय विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. दुसरीकडे, हेमंत सोरेनच्या चौकशीसाठी ईडीने 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, ईडी कोर्टाने त्यांनी 5 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. या कोठडीच्या कालावधीतच विश्वासदर्शक ठरावासाठी सभागृहात मत टाकण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे.