पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

बऱ्याच गावांमध्ये लग्नसोहळे-विविध शुभकार्य सुरू असतानाच दुपारनंतर ढगांचा गडगडाट-वादळी वाऱ्यासह पाऊस : अनेकांची तारांबळ
वार्ताहर /किणये
तालुक्मयाच्या पश्चिम भागात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह, ढगांचा गडगडाट होऊन पाऊस झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. गेल्या बऱ्याच दिवसांपासून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला होता. शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तालुक्मयातील नागरिक विविध प्रकारची वस्तू खरेदी करण्यात गुंतले होते. तसेच बऱ्याच गावांमध्ये लग्नसोहळे व विविध शुभकार्य सुरू होते. असे चित्र सुरू असतानाच दुपारनंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्यामुळे साऱ्यांमध्येच उत्साह दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्मयात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे बळीराजाला शेतशिवारात काम करणे मुश्किल झाले होते. तसेच पावसाअभावी विहिरी, कूपनलिका आदींच्या पाणीपातळीत घट झाली होती. त्यामुळे शिवारातील पिके सुकू लागली होती. कधी एकदा जोरदार पाऊस येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. आणि अखेर अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावरच वरूणराजाने आपली कृपादृष्टी दाखविल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
मच्छे, पिरनवाडी, वाघवडे, संतिबस्तवाड, बामणवाडी, कावळेवाडी बिजगर्णी, राकसकोप, बेळवट्टी, सोनोली, बोकनूर, येळेबैल या परिसरात पाऊस झाला. यामध्ये परिसरात अधिक प्रमाणात पाऊस संतिबस्तवाड, वाघवडे परिसरात झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. काही शिवारांमध्ये पावसाचे पाणी साचलेले पहावयास मिळाले. तालुक्मयाच्या बऱ्याच गावांमध्ये सध्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. पावसाभावी भूजल पाणीपातळीत घट झाली असल्यामुळे पाण्यासाठी टँकरचा आधार बऱ्याच नागरिकांना घ्यावा लागत आहे. शुक्रवारी बऱ्यापैकी पाऊस झाला असा पाऊस आणखी एक दोन वेळा झाल्यास थोड्या प्रमाणात पाणी समस्या दूर होणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे येणाऱ्या खरीप हंगामाच्या मशागतीला सुऊवात करण्यात येणार आहे हा पाऊस मशागतीसाठी उपयोगी ठरला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मच्छे व पिरनवाडी भागातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले होते. गटारीमध्ये कचरा सापडला होता. त्यामुळे पावसाचे पाणी वाढल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला नसल्याने थेट काही जणांच्या दुकानात तर काही जणांच्या घरातही पाणी शिरले. यामुळे या नागरिकांची तारांबळ उडाली होती.देसूर, नंदीहळळी भागात विटांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेण्यात येते. सध्या वीटभट्टीचा हंगाम जोमाने सुरू आहे. कच्च्या विटाही मोठ्या प्रमाणात बनवून ठेवलेल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मात्र वीटउत्पादक कच्चा विटांवरती ताडपत्री व प्लास्टिक झाकताना दिसत होते.