गुजरातने उडवला हैदराबादचा धुव्वा

गुजरातने उडवला हैदराबादचा धुव्वा

सात गडी राखून विजय : सामनावीर मोहित शर्माचे 25 धावांत 3 बळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात टायटन्सने आपल्या होम ग्राऊंडवर विजयाचा धडाका कायम ठेवला. रविवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेट्सनी पराभव करत आपला दुसरा विजय प्राप्त केला. हैदराबादने गुजरातसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गुजरातने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 19.1 षटकात पार केले. 25 धावांत 3 बळी घेणारा मोहित शर्मा तसेच युवा साई सुदर्शन, डेव्हिड मिलर गुजरातच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयासह गुजरातचा संघ तीन सामन्यांतून दोन विजय आणि 4 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. याचबरोबर हैदराबादचा संघ तीन सामन्यांत एक विजय आणि दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
 
हैदराबादच्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला चांगली सुरुवात मिळाली. कर्णधार शुभमन गिल आणि साहा यांनी पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. संघाला पहिला धक्का पाचव्या षटकात साहाच्या रूपाने बसला, ज्याने 13 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. यानंतर 28 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 26 धावा करून 10 व्या षटकात कर्णधार गिल पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, वृद्धीमान बाद झाल्यावर साई सुदर्शन इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला अन् वादळी इनिंग खेळून गेला. साईने 36 चेंडूत 45 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. साईची ही खेळी गुजरातसाठी टर्निंग पाँईट ठरली. साई व डेव्हिड मिलर यांच्यात तिसऱ्या विकेटसाटी 64 धावांची भागीदारी झाली. 17 व्या षटकात साई बाद झाल्यानंतर ही भागीदारी संपुष्टात आली. यानंतर डेव्हिड मिलरने विजय शंकरसोबत चौथ्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. तर डेव्हिड मिलरने 27 चेंडूत 44 धावांची नाबाद खेळी केली. मिलरने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. विजय शंकर 14 धावांवर नाबाद राहिला.
मोहित शर्माचे 3 बळी, हैदराबादच्या फलंदाजांची निराशा
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादने पहिल्या 4 षटकांत चांगली सुरुवात केली होती आणि वेगाने धावा केल्या होत्या. परंतु पहिली विकेट पडल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. हैदराबादने 15 व्या षटकात केवळ 114 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. मुंबईविरुद्ध सामन्यात धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला 19 धावाच करता आल्या. दुसरीकडे अभिषेक शर्माला 29 धावांवर समाधान मानावे लागले. मयांक अगरवालही 16 धावा करुन परतला.   हेनरीच क्लासेन (24) आणि एडन मार्करम (17) या दोन्ही फलंदाजांनीही यावेळी सपशेल निराशा केली. यानंतर समद आणि शाहबाज यांनी सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. यामुळे हैदराबाद 170 धावा ओलांडणार असे वाटत असतानाच अखेरच्या षटकात पुन्हा गुजरातच्या गोलंदाजांनी डाव उलटवला. मोहित शर्माने शेवटच्या षटकात केवळ 3 धावा देत 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यामुळे हैदराबादला 8 बाद 162 धावापर्यंतच मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक :
हैदराबाद 20 षटकांत 8 बाद 162 (अभिषेक शर्मा 29, क्लासेन 24, मार्करम 17, अब्दुल समद 29, शाहबाद अहमद 22, मोहित शर्मा 25 धावांत 3 बळी, उमेश यादव, रशीद खान, नूर अहमद व उमरझाई प्रत्येकी एक बळी).
गुजरात टायटन्स 19.1 षटकांत 3 बाद 168 (वृद्धीमान साहा 25, शुभमन गिल 36, साई सुदर्शन 45, मिलर नाबाद 44, विजय शंकर नाबाद 14, पॅट कमिन्स, अहमद, मार्कंडे प्रत्येकी एक बळी).