लोकसभा निवडणुकीसाठी म.ए.समितीकडे पहिला अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी म.ए.समितीकडे पहिला अर्ज दाखल

बेळगाव : लोकसभा निवडणूक म. ए. समितीही लढविणार आहे. त्यामुळे म. ए. समितीच्यावतीने इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी म. ए. समितीकडे एक अर्ज दाखल झाला आहे. शनिवार दि. 6 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदत असून मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंगळवारी म. ए. समितीच्या उमेदवारीसाठी साधना सागर पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. मदन बामणे, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांनी हा अर्ज स्वीकारला. म. ए. समितीच्यावतीने ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणूक 7 मे रोजी होणार आहे. ही निवडणूक लढवून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार, तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी म. ए. समितीचा उमेदवार निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे. त्यासाठी 32 जणांची कमिटीही करण्यात आली आहे. 32 जणांची कमिटी जो उमेदवार देईल त्यांना सर्वजण पाठिंबा दर्शविणार आहेत. त्यामुळे म. ए. समितीकडे अर्ज दाखल करण्यासाठी अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. येत्या चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत. रंगुबाई पॅलेस येथे हे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.