अर्थार्जन करण्यासाठी उद्योजकतेची कास धरा

अर्थार्जन करण्यासाठी उद्योजकतेची कास धरा

चकोर गांधी यांचा सल्ला : ‘क्या जमाना बदल रहा हैं?’ यावर व्याख्यान : लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीतर्फे आयोजन
बेळगाव : प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये विचारांचा फरक असतोच. मात्र, ज्येष्ठ पिढीने उगवत्या पिढीवर विश्वास ठेवायला हवा. त्यांची बदलती जीवनशैली स्वीकारायला हवी. या पिढीचे स्वत:चे एक जग आहे, हे मान्य करा आणि तुमची क्षमता आहे तोपर्यंत अर्थार्जन करण्यासाठी उद्योजकतेची कास धरा, असा सल्ला बिझनेस कोच चकोर गांधी यांनी दिला. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीतर्फे भाग्यनगर सिटी हॉल येथे ‘क्या जमाना बदल रहा हैं?’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर लोकमान्यचे संस्थापक व ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब उपस्थित होते. चकोर गांधी म्हणाले, बदल हा सतत घडत असतो. पूर्वी 20-25 वर्षांनंतर पिढीत बदल व्हायचा. आज तीन वर्षांनी पिढी बदलते आहे. नवीन पिढीला लग्नाचे बंधन आणि मुलांची जबाबदारी नको आहे. या पिढीपासून आत्या, मामा, मावशी, काका हे नातेसंबंध दूर झाले आहेत.
लिंग समानता हा नवीन शब्द परवलीचा झाला आहे. येणाऱ्या मुली किंवा सुना घरी बसणार नाहीत. त्यामुळे महिलांनी आपल्या पतीच्या व्यवसायामध्ये लक्ष घालायला हवे किंवा स्वत: अर्थार्जन करायला हवे. तरुण पिढीकडे संयमाचा अभाव आहे. त्यांना जुन्या आठवणींची पुनरावृत्ती ऐकायची नाही आहे. ‘फास्टर, चिपर, बेटर’ याकडेच त्यांचा कल आहे. या पिढीला स्व-भान व आत्मसन्मान महत्त्वाचा वाटतो. ही पिढी ‘शेअरिंग इकॉनॉमी’वर भर देते, असेही ते म्हणाले.
ही पिढी स्वत:चे जग तयार करते. त्यांची वाचनाची, अर्थार्जनाची साधने बदलली आहेत. या पिढीवर आपण विश्वास ठेवून त्यांचे बदलते जग स्वीकारायला हवे. त्याचवेळी आपण आपले आर्थिक नियोजनही करायला हवे. घराघरात नैराश्य ही एक समस्या होत आहे. ती टाळण्यासाठी आपण उत्पादकतेकडे वळायला हवे. येणाऱ्या काळामध्ये भारत आता सेवा देणारा देश नसून उत्पादन वाढवणारा देश होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत क्षमता आहे, तोपर्यंत विविध उत्पादनांतून आर्थिक गंगाजळी कशी वाढवता येईल, याचा विचार करा, असे आवाहन चकोर गांधी यांनी केले. ‘जमाना बदल रहा हैं, फिर भी वो हमारा हैं’ हे आपण लक्षात ठेवूया, असे सांगून त्यांनी समारोप केला. प्रारंभी प्रास्ताविक करताना किरण ठाकुर म्हणाले, नव्या बदलाला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्माबद्दल आस्था निर्माण झाली आहे. शांतता निर्माण करणे हे भारताचे ध्येय आहे आणि जगालाही त्याचे भान आले आहे.  किरण ठाकुर यांच्या हस्ते चकोर गांधी यांना लोककल्प फाऊंडेशननिर्मित उत्पादनांची भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन लोककल्पच्या समन्वयक मालिनी बाली यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.