द्रमुकचे राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध

द्रमुकचे राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध

तामिळनाडूमधील सर्व 39 लोकसभा जागांवर 19 एप्रिल रोजी 72.09 टक्के मतदान झाले होते आणि या राज्यात द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडी, अण्णाद्रमुक आणि भाजपच्या नेतृत्वाखालील रालाआ आघाडी अशी तिरंगी लढत होती. तामिळनाडूमध्ये प्रमुख एक्झिट पोलनी रालोआला 2 ते 4 आणि इंडी गटाला 33 ते 37 जागा दिल्या होत्या तसेच भाजपला काही जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. अण्णाद्रमुकने 2019 च्या निवडणुकीत भाजपशी युती केली होती, परंतु भाजपचे राज्य प्रमुख के. अन्नामलाई यांच्याशी झालेल्या वादानंतर गेल्या वर्षी ते रालोआमधून बाहेर पडले होते.
2019 मध्ये द्रमुक-काँग्रेस आघाडीला राज्यातील एकमेव थेनी जागा हुकून तिथे अण्णाद्रमुक जिंकले होते. यावेळी मात्र थेनीने द्रमुकला कौल दिलेला आहे. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकशिवाय उतरताना भाजपने नऊ प्रादेशिक पक्षांशी युती केली होती. यामध्ये पीएमकेने 10 जागा लढवल्या होत्या. इतर रालोआ सदस्यांमध्ये तामिळ मनिला काँग्रेस आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघम यांचा समावेश आहे. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
इंडी आघाडीत द्रमुक, काँग्रेससह सीपीआय आणि सीपीआय (एम), विदुथलाई चिऊथाईगल काची (व्हीसीके), माऊमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) यांचा समावेश असून त्यात सर्वाधिक जागा द्रमुकने जिंकल्या आहेत व त्याखालोखाल काँग्रेसने कामगिरी केली आहे. खुद्द द्रमुकला ज्याबद्दल आशंका होती आणि जिथे त्यांना कठीण लढाईची अपेक्षा होती त्या वेल्लोर, तिऊनेलवेली, थेनी, रामनाथपूरम, कोईम्बतूर, कल्लाकुरिची, विल्लुपुरम या जागांवर त्यांनी चांगली कामगिरी करून दाखविली आहे. तर भाजपने यंदाच्या निवडणुकीत मतांची हिस्सेदारी वाढवत भविष्यासाठी तयारी करण्याचे संकेत दिले आहेत.
निवडणूक निकालाचा ‘एन’ फॅक्टर
निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच एन फॅक्टर जोडला गेलेला होता. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचा अपवाद वगळल्यास कुठलाही पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यास यशस्वी ठरलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सलग तिसऱ्यांदा सराकर स्थापन करत पंडित नेहरूंच्या कामगिरीची बरोबरी करण्याची संधी होती आणि आहे. यंदाच्या निवडणुकीच्या निकालांनी दिलेला एन फॅक्टर म्हणजे नमो, नितीश आणि नायडू आहे. नमो म्हणजे नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या रालोआला बहुमत मिळाले आहे. रालोआला 294 जागा मिळाल्या असल्या तरीही भाजप सलग तिसऱ्यांदा बहुमतासह मोदी सरकार स्थापन करण्यास अयशस्वी ठरला आहे.
आता एक एन म्हणजेच नेहरूंच्या कामगिरीची बरोबरी करत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान मोदींना दोन एन- नितीश कुमार आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांच्या भूमिकेवर अवलंबून रहावे लागणार आहे. नितीश आणि नायडू यांच्या भूमिकेमुळेच सरकार ठरणार आहे. नितीश यांच्या नेतृत्वाखालील संजदला 12 जागा तर नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला 16 जागा मिळाल्या आहेत. हे दोन्ही पक्ष रालोआत सहभागी आहेत.
एन फॅक्टर हटविल्यास…
रालोआला मिळालेल्या 294 जागांपैकी या दोन्ही पक्षांचे 28 संख्याबळ हटविल्यास 268 वर रालोआचा आकडा येतो. अशा स्थितीत रालोआला बहुमत सिद्ध करणे अवघड ठरू शकते. नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ नितीश कुमार आणि नायडू यांच्या भूमिकेवर निर्भर असेल. राजकीय स्थिती पाहता सत्तारुढ रालोआसोबत विरोधी पक्षांची आघाडीही अॅक्टिव्ह मोडमध्ये आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च तेदेप प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधला, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेण्यासाठी बिहार भाजप अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री निवासस्थानात धाव घेतली आहे. नितीश कुमार यांच्याशी सम्राट चौधरी यांची भेट झाली नसल्याचे समजते. परंतु नितीश यांनी सोमवारीच दिल्लीत जात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.
राजदने नितीश कुमार हे मोठा निर्णय घेऊ शकतात असा दावा केला आहे. परंतु संजद महासचिव आणि प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी आमचा पक्ष रालोआत असून रालोआतच राहणार असल्याचे नमूद केले आहे.